मन, बुद्धी आणि देह श्रीहरीच्या चरणी अर्पण होण्यासाठी साधिकेने केलेला भावजागृतीचा प्रयोग

‘भावजागृती’ हा साधकाचा साधनेच्या वाटचालीतील मोठा आधारस्तंभ आहे. साधकाच्या भावामुळे त्याला भगवंत विविध अनुभूती देतो, त्याचे विविध संकटप्रसंगी रक्षण करतो. असे म्हटले आहे, ‘सर्व सौभाग्यालंकारात जर कपाळावर कुंकू नसेल, तर स्त्रीच्या अन्य अलंकारांना फारसे महत्त्व रहात नाही.’ त्याचप्रमाणे भाव हा साधनेतील सौभाग्यालंकार (कपाळावरील कुंकू) आहे. ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार भगवंत पदोपदी साधकाच्या समवेत रहातो, त्यामुळे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांमध्ये भावजागृती होण्यासाठी भावजागृतीचे प्रयोग करणे, भावसत्संग, तसेच भक्तीसत्संग इत्यादींच्या माध्यमातून प्रयत्न करण्यास सांगितले. नंदुरबार (महाराष्ट्र) येथील सनातनच्या साधिका सौ. निवेदिता जोशी (६१ टक्के आध्यात्मिक पातळी, वय ५२ वर्षे) यांनी भावजागृतीसाठी विविध प्रयोग केले. ते येथे दिले आहेत.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

प्रारंभ 

‘भावप्रयोग करण्यासाठी आपण सर्वांनी डोळे मिटूया. अंतःकरणातील श्रीहरीला संपूर्णपणे शरण जाऊया. आपण संपूर्ण समर्पणभावाने श्रीहरि आणि गुरुदेव यांना शरण गेल्यावर शंख, चक्र, गदा, पद्म धारण केलेली प्रेमळ मूर्ती आपल्या हृदयमंदिरात आसनस्थ झाल्याचे आपण अनुभवत आहोत. ती प्रेमळ मूर्ती, म्हणजे विष्णुरूपातील गुरुमाऊली आहे. आपल्यातील भाव बघून गुरुमाऊली हाकेसरशी आपल्या हृदयमंदिरात विराजमान होत आहे.

१. ‘स्वतःला गुरुचरणी अर्पण कर’, असे बुद्धीने मनाला सांगणे 

आपली बुद्धी आपल्या मनाला सांगत आहे, ‘‘तुला श्रीहरीच्या चरणी एकरूप व्हायचे आहे. तुझ्यामध्ये जे जे विकल्प निर्माण होतात, ते ते तू गुरुमाऊलींच्या चरणी रिते कर, म्हणजे स्वतःला गुरुचरणी अर्पण कर. यामुळे तुझा उद्धार होणार आहे.’’

२. मन श्रीहरीच्या चरणी अर्पण झाल्यावर मनाचे जडत्व नष्ट होऊन ते प्रसन्न होणे 

सौ. निवेदिता जोशी

बुद्धीने मनाला असे कळवळून सांगितल्यावर मन हलके झाले आहे. आपल्या मनाचे जडत्व नष्ट झाले आहे. असे हलके झालेले मन आपण आपल्या ओंजळीत घेऊन हृदयमंदिरात असलेल्या श्रीहरीच्या चरणी अर्पण केले आहे. तेव्हा मन पुष्कळ आनंदित झाले आहे. आपले मन प्रसन्नतेने ‘श्रीहरि, श्रीहरि’ असा जप करू लागले आहे.

३. बुद्धी आणि एक लहान कण बनलेला स्थूलदेह गुरुचरणांवर अर्पण होणे 

त्यानंतर बुद्धीही श्रीहरीच्या चरणी अर्पण झाली आहे. त्यामुळे स्थूलदेहाला मन-बुद्धी विरहित अवस्था प्राप्त झाली आहे. आता आपल्या देहाचा एक लहान कण बनून तो श्रीगुरुचरणी अर्पण झाला आहे.

४. मन गुरुदेवांच्या हातात असल्याने त्याचे कमळाच्या फुलात रूपांतर होऊन ते आनंदी होणे 

आता केवळ आणि केवळ श्रीहरीचे अस्तित्व आत अन् बाहेर असल्याचे आपण अनुभवत आहोत. ही अवस्था बघून श्रीहरीच्या रूपातील गुरुदेवांना आनंद झाला आहे. त्यांनी आपल्या मनाला उचलून हातात घेतले आहे. आपल्या मनाचे रूपांतर कमळाच्या फुलात झाले आहे. त्यामुळे आपले मन सुगंधी आणि विशाल झाले आहे. सर्वांत सुरक्षित अशा गुरुदेवांच्या हातात आपले मन असल्याने ‘आता त्याच्यावर अन्य संस्कार होणार नाहीत’; म्हणून ते आनंदी झाले आहे.

५. बुद्धीची सुंदर वेणी बनून ती श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी त्यांच्या केसांत माळणे

त्यानंतर बुद्धीची सुंदर वेणी (गजरा) झाली आहे. ही वेणी साक्षात् श्री महालक्ष्मी स्वरूपातील  श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी त्यांच्या केसांमध्ये माळली आहे. त्यामुळे आपल्या बुद्धीचे सौंदर्य अजून वाढले आहे. ती अजूनच सुगंधित झाली आहे आणि हा सुगंध संपूर्ण ब्रह्मांडात प्रक्षेपित होऊ लागल्याने मनाला शांत वाटत आहे.

६. देह एक कण बनून गुरुचरणांवर अर्पण झाल्याने देहाचे सर्व पाप नष्ट होऊन देह चैतन्यमय बनणे 

आपला देह धुळीचा एक कण बनून गुरुचरणांमध्ये सामावून गेला आहे. धुळीचा कण ज्या ठिकाणी गुरुरूपी श्रीहरीच्या चरणी एकरूप झाला, त्या ठिकाणी श्री गंगा (नदी) असल्याने आपोआपच सर्व तीर्थांमध्ये देहाचे स्नान झाले आहे. त्यामुळे देहाद्वारे घडलेले पापही नष्ट झाले आहे. आपला देह चैतन्यमय झाला आहे. आपल्या स्थूलदेहाला आता अस्तित्वच उरले नाही. आपले मन आणि बुद्धी हेही उरलेच नाहीत; म्हणून तो देह सर्व बाजूंनी मुक्त झाला आणि श्रीहरीच्या पावनी चरणी सामावून गेला आहे.

आनंदाचे डोही आनंद तरंग !

असे हे विष्णुतत्त्व सर्वत्र भरून असल्याचे अनुभवत आपण श्रीगुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करून थांबूया.’

– सौ. निवेदिता जोशी (वर्ष २०२४ मधील आध्यात्मिक पातळी ६१ टक्के आणि वय ५२ वर्षे), नंदुरबार, जिल्हा नंदुरबार. (१३.३.२०२२)