
नवी मुंबई – सध्याच्या स्पर्धेच्या युगामध्ये पालकांनी मुलांना उत्तम संस्कार देऊन राष्ट्राचे आदर्श नागरिक घडवण्याकडेही लक्ष देणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांनी येथे केले. ते ‘श्रीराम राधाकृष्ण मेमोरियल ट्रस्ट’च्या वतीने गरजूंना आर्थिक साहाय्य वितरणाच्या कार्यक्रमात बोलत होते. नेरूळ येथील आगरी-कोळी भवनात हा कार्यक्रम पार पडला. या वेळी ‘श्रीराम राधाकृष्ण मेमोरियल ट्रस्ट’चे अध्यक्ष आर्. राधाकृष्णन्, सचिव ललिता आर्., ब्रिगेडियर धर्म प्रकाश, राजेश ग्रोवर, के.आर्. गणेश आदी उपस्थित होते.
या वेळी अधिवक्ता संजीव पुनाळेकर म्हणाले की, प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये दानधर्म करणे आवश्यक असल्याचे धर्मशास्त्रात म्हटले आहे. पालकांना या संस्थेच्या वतीने मिळालेल्या आर्थिक सहाय्याची जाण ठेवून त्यांनी मुलांना चांगले शिक्षण आणि उत्तम संस्कार देऊन राष्ट्राचे आदर्श नागरिक घडवण्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
या वेळी आर्. राधाकृष्णन् म्हणाले की, पहिल्या वर्षी वरील घटकांतर्गत ९४ जणांना, दुसर्या वर्षी ११८ जणांना आर्थिक साहाय्य देण्यात आले. ‘ट्रस्ट’ने महिलांना वैयक्तिकरित्या किंवा गटाच्या माध्यमातून व्यवसाय (उपक्रम) चालू करण्यासाठी प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत स्वावलंबी महिलांना अतिरिक्त आर्थिक साहाय्य देण्याची ‘ट्रस्ट’ची योजना आहे.
या वेळी ‘श्रीराम राधाकृष्ण मेमोरियल ट्रस्ट’च्या वतीने गरजू विधवा, एकल पालक आणि अनाथ मुले अशा १३६ जणांना प्रत्येकी १२ सहस्र असे एकूण १६ लाख ३२ सहस्र रुपयांचे धनादेशाचे वाटप करण्यात आले.
१३६ लाभार्थ्यांमध्ये ६ अनाथ मुले, ११ एकल पालक, ११९ विधवा महिला यांचा समावेश आहे. अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांच्या हस्ते या निधीचे धनादेश लाभार्थ्यांना देण्यात आले.