‘५.३.२०२५ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात ‘साधिकेच्या जीवनात आलेले कठीण प्रसंग आणि त्या कालावधीत तिने अनुभवलेली गुरुकृपा’ यांविषयी जाणून घेतले.
आज या लेखाचा उर्वरित भाग पाहूया.
या लेखाचा आधीचा भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा. https://sanatanprabhat.org/marathi/889937.html

३. उजव्या हाताला संवेदना न जाणवणे आणि हात लुळा पडणे अन् त्या प्रसंगात अनुभवलेली परात्पर गुरु डॉ. आठवले यांची कृपा !

३ अ. उजव्या हाताला संवेदना जाणवत नसल्याने हातात भ्रमणभाषसंच घेऊ न शकणे : वरील घटना घडून ५ – ६ दिवस झाल्यानंतर एक दिवस पहाटेच्या वेळी मी नामस्मरण करत होते. ‘२ घंटे झाले असावेत’, असे वाटून मी वेळ पहाण्यासाठी माझा भ्रमणभाषसंच हातात घेऊ लागले; परंतु मला तो उचलता येईना. माझ्या उजव्या हाताची पकड (ग्रिप) गेली होती. ‘माझ्या हाताला मुंग्या आल्याप्रमाणे झाले असावे’, असे मला वाटले. मी उजवा हात झटकला आणि डाव्या हाताने त्यावर दाबले; पण उपयोग झाला नाही. माझा हात लुळा पडला होता. माझ्या हाताच्या संवेदना नाहीशा झाल्या होत्या. त्या वेळी मी खोलीत एकटीच होते.
नंतर त्याच दिवशी संध्याकाळी माझी जीभ लुळी पडली आणि मला बोलणे कठीण झाले होते. नंतर काही क्षणांनी माझी जीभ पूर्ववत् झाली; मात्र याही स्थितीत श्री गुरूंनी मला अतिशय स्थिर ठेवले. माझे मन जराही विचलित होऊ दिले नाही. माझ्या मनात ‘आता कसे होणार ?’, असा साधा विचारही आला नाही. माझ्या मनात ‘केवळ उपाययोजना काढण्यासाठी क्रियमाण वापरायचे, बाकी सर्व ईश्वरेच्छा’, एवढाच विचार होता. गुरुदेवा, तुमच्या कृपेनेच मला या प्रसंगात स्थिर रहाणे शक्य झाले.
३ आ. ‘नामजपादी उपाय आणि औषधोपचार’ यांमुळे गुरुदेवांच्या कृपेने दोन-अडीच घंट्यांत हाताला संवेदना जाणवू लागणे : मी सद्गुरु गाडगीळकाकांना भ्रमणभाषवरून संपर्क केला. मी त्यांना माझ्या स्थितीविषयी सांगितले. त्यांनी मला लगेच नामजपादी उपाय सांगितले. मी नामजपादी उपाय केले आणि औषधोपचार घेतले. नंतर मला हाताला संवेदना जाणवू लागल्या. अवघ्या दोन-अडीच घंट्यांतच माझे मी हळूहळू करू शकेन, इतपत बरी झाले. ही सारी सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांचीच कृपा !
३ इ. कठीण प्रसंगात स्थिर राहून तो स्वीकारायला आणि आनंदी रहाण्यासाठी प्रयत्न करायला शिकवणारे प.पू. गुरुदेव ! : मला ‘या प्रसंगात स्थिर रहाणे, मनात नामजपादी उपाय आणि औषधोपचार विचारून घेण्याचा विचार येणे, ते चिकाटीने करणे आणि त्यातून बाहेर पडणे’, हे सर्व गुरुदेवांमुळेच शक्य झाले. मी त्या माध्यमातून श्री गुरूंची कृपा अुभवली. मी विचार केला, ‘जे काही घडेल, त्यातून गुरुदेव माझे प्रारब्ध संपवत आहेत. ‘मला प्रारब्धातून बाहेर काढणे’, ही भगवंताचीच इच्छा आहे. मला ते स्थिर राहून स्वीकारायचे आहे आणि आनंदी रहाण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत.’ गुरुदेवा, आपल्या कृपेनेच हे शक्य होत आहे.
४. मुलाच्या आध्यात्मिक त्रासात वाढ होणे
४ अ. मुलाच्या संदर्भात घडलेल्या प्रसंगात ‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव समवेत आहेत’, या विचाराने निश्चिंत असणे : एवढ्यावरच प्रारब्धाने माझी पाठ सोडली नाही. एकीकडे प्रारब्ध संकट म्हणून उभे ठाकत होते आणि दुसरीकडे त्या प्रत्येक वेळी सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव माझे रक्षण करत होते. त्यांच्या कृपेने माझ्या प्रारब्धाची तीव्रता उणावून ते सुसह्य झाले. त्यामुळे मी सर्वकाही ईश्वरावर सोपवून निर्धास्त होते. अशातच मुलाच्या आध्यात्मिक त्रासाची तीव्रता पराकोटीची वाढली. मला मुलाच्या संदर्भातील एका प्रसंगाला मला सामोरे जावे लागले. त्या कठीण प्रसंगीही गुरुदेवांनी मला अत्यंत स्थिर ठेवले होते. आश्रमातील एका साधकाने पुढाकार घेऊन तो संपूर्ण प्रसंग हाताळला. मला काहीच पहावे लागले नाही. माझ्या मनाची जराही चलबिचल झाली नाही कि मला अस्वस्थता आली नाही. ‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव माझ्या समवेत आहेत’, या विचाराने मी निश्चिंत होते. ‘यातून वाईट काहीच होणार नाही’, ही दृढ श्रद्धा माझ्या मनात होती.
५. जाणवलेली सूत्रे
या सर्व प्रसंगांमध्ये मला साधकांचे प्रेम अनुभवता आले. माझ्यामधील कृतज्ञताभाव वृद्धींगत झाला. मला प्रसंगांकडे साक्षीभावाने पहायला शिकता आले. मला भगवंताच्या अनुसंधानात अधिकाधिक वेळ रहाण्याची सवय लागली. माझ्यातील ‘सूक्ष्म रूपाच्या श्री गुरु सतत माझ्या समवेत असतात’, या जाणिवेत वाढ झाली. ‘प्रत्येक प्रसंग, अगदी प्रारब्ध हीही भगवंताची इच्छा असते’, हे मला शिकता आले. प्रारब्ध भोगण्याची शक्ती देणार्या श्री गुरूंची कृपा अनुभवण्यातील आनंद मला घेता आला.
६. प्रार्थना
‘मला सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांचे सूक्ष्मातील सान्निध्य सदैव अनुभवता येवो आणि माझी श्री गुरूंवरील श्रद्धा उत्तरोत्तर वृद्धींगत होवो’, ही भगवंताच्या चरणी प्रार्थना आहे.’
(समाप्त)
– श्रीमती अलका वाघमारे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२२.१०.२०२४)
|