‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले विविध मासिके आणि ग्रंथ यांतील उपयुक्त लिखाण मानवजातीला उपलब्ध व्हावे’, यासाठी त्यावर खुणा करतात, त्याचे संकलन करतात अन् नंतर ते लिखाण ग्रंथांमधून प्रसिद्ध केले जाते. माझ्या मनात ‘हे लिखाण निवडण्यासाठी ते खुणा कशा प्रकारे करतात ?’, अशी एक कुतूहलमिश्रित जिज्ञासा होती. मी ग्रंथांशी संबंधित सेवा करतांना ते मला पहायला मिळाले आणि मला ती सेवा करण्याची संधी मिळाल्यानंतर त्यातील विविधांगी पैलू त्यांच्याकडून शिकायला मिळाले. त्याविषयीची माहिती पुढे दिले आहे.

१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी स्थुलातून शिकवणे
१ अ. आरंभी साधकाला मासिकांतील कात्रणे देऊन त्यांतील लिखाणावर खुणा करायला सांगणे आणि त्यांतील खुणा केलेले लिखाण तपासतांना साधकाला त्याच्या चुका लक्षात आणून देणे अन् सेवा करतांना आवश्यक असलेले गुणही साधकाला शिकवणे : वर्ष २०१५ मध्ये ‘साधू’ या विषयावर ग्रंथमालिका सिद्ध करत होतो. तेव्हा प.पू. डॉक्टरांनी मला त्यांच्याकडे असलेल्या विविध मासिकांतील काही कात्रणे देऊन सांगितले, ‘‘यांतील ग्रंथात घेण्यासाठी आवश्यक लिखाणावर खुणा करून मला पहायला दे.’’ ‘मला ही सेवा करणे सोपे जावे’, यासाठी त्यांनी उदाहरणादाखल काही पानांवर खुणा करून दिल्या होत्या. मी ती विविध कात्रणे आणि लिखाण यांवर खुणा करून प.पू. डॉक्टरांना ते पहायला ठेवले. त्यांनी ते पाहून त्यातील चुका मला दाखवून दिल्या.
१ अ १. सेवा करतांना बुद्धीचा अडथळा नको : मला ‘एका परिच्छेदातील लिखाण निवडायचे कि नाही’, याविषयी संभ्रम होता. मी त्या लिखाणावर खूण केली नव्हती आणि प.पू. डॉक्टरांनी नेमके तेच लिखाण निवडले. तेव्हा माझ्या लक्षात आले, ‘देवाने माझ्या मनात ‘ते लिखाण घ्यावे’, असा पहिला विचार दिला होता’; मात्र यात बुद्धीचा अडथळा आल्याने माझ्याकडून तशी कृती झाली नाही.’
१ अ २. इतरांचा विचार करणे : एका ७ ओळींच्या परिच्छेदातील काही लिखाण मला आवश्यक वाटत होते; मात्र मी त्या परिच्छेदातील पूर्ण लिखाण निवडले. खरेतर त्यातील पहिल्या २ ओळी आणि केवळ शेवटची ओळ एवढेच लिखाण निवडणे आवश्यक होते. प.पू. डॉक्टरांनी केवळ त्या ओळींवरच खूण केली होती. ‘मुद्देसूद निवड केल्याने लिखाण टंकलेखन करणार्या साधकाचा वेळ वाया जाणार नाही’, हे त्यांनी यातून दाखवून दिले. या प्रसंगातून ‘इतरांचा विचार कसा करायला हवा’, हे माझ्या लक्षात आले.
१ अ ३. गुरुदेव सेवा पहाणार असल्याने साधकाने निश्चिंतपणे सेवा करणे : त्यानंतर ‘तीर्थक्षेत्रे’ आणि ‘कुंभमेळा’ अशा अन्य विषयांवर ग्रंथमालिका करायच्या असल्याने प.पू. डॉक्टरांनी मला या विषयीची कात्रणेही दिली. ‘माझ्याकडून काही राहिले, तर नंतर गुरुदेव पहाणार आहेतच’, या विचारामुळे मी तेव्हा ही सेवा निश्चिंतपणे करू शकलो.
२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सूक्ष्मातून शिकवणे

२ अ. एका साधिकेने साधकाला ‘तुमच्यानंतर कुणी तुम्ही केलेली सेवा पहाणार नाही’, असे सांगितल्यानंतर साधकाच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होणे आणि त्याने गुरुदेवांची ध्वनीफीत ऐकतांना उत्तर मिळून मन स्थिर होणे : वर्ष २०२४ मध्ये सहसाधिकेने मला एक मासिक दिले. त्या साधिकेने मला सांगितले, ‘‘गुरुदेवांनी यातील काही पानांवर खुणा केलेल्या नाहीत. तुम्ही खुणा करायच्या आहेत. तुम्ही खुणा केल्यानंतर ते पहाणार नाहीत.’’ तेव्हा माझ्या मनात ‘ते पहाणार नाहीत, तर कसे करायचे ? माझ्याकडून काही महत्त्वाचे सुटणार नाही ना ?’, असे अनेक प्रश्न निर्माण झाले. दुसर्या दिवशी मी गुरुदेवांच्या आवाजातील एक ध्वनीफीत ऐकत होतो. गुरुदेवांनी सांगितलेले ‘अध्यात्मात भाव आणि श्रद्धा हे चलनी नाणे आहे’, हे वाक्य ऐकल्यानंतर माझ्या मनाची होणारी घालमेल आणि प्रश्न थांबले. माझे मन स्थिर झाले.
२ आ. साधकाने ‘बुद्धी वापरणे, प्रार्थना करणे आणि भाव ठेवणे’ या टप्प्यांनुसार केलेली सेवा अन् त्या वेळी त्याला जाणवलेली सूत्रे : त्यानंतर गुरुदेवांनी माझ्याकडून पुढील टप्प्यांनी ती सेवा करून घेतली.
२ आ १. लिखाण बुद्धीने निवडणे : आरंभी मी ‘ते लिखाण ग्रंथासाठी आवश्यक आहे का ?’, याचा बुद्धीने विचार करून ते निवडू लागलो. तेव्हा माझ्या मनात संभ्रमावस्था (हे लिखाण निवडायचे कि नाही अशी अवस्था) अधिक निर्माण होत होती.
२ आ २. प्रार्थना करून लिखाण निवडणे : मी सेवा करण्यापूर्वी प्रार्थना केल्यानंतर मला लिखाण अधिक चांगल्या प्रकारे निवडता येऊ लागले, तरीही माझ्या मनात काही वेळा ‘हा परिच्छेद निवडायचा कि नाही’, अशी संभ्रमावस्था निर्माण होत होती. तेव्हा मी गुरुदेवांना शरण जाऊन प्रार्थना केल्यानंतर तेच मला ‘हे लिखाण निवड किंवा निवडू नको’, असे सुचवत असल्याचे जाणवले. त्याप्रमाणे मी कृती केली. या टप्प्यालाही मला पूर्णपणे आंतरिक समाधान मिळत नव्हते.
२ आ ३. सेवा करतांना ‘गुरुदेव सूक्ष्मातून समवेत आहेत’, असा भाव ठेवणे : ‘सेवा करण्यापूर्वी स्वतःवरील त्रासदायक आवरण काढून आणि नामजपादी उपाय केल्यानंतर भाव ठेवून ही सेवा केल्यास अधिक लाभ होईल’, असे गुरुदेव मला सूक्ष्मातून सांगत असल्याचे जाणवले. नंतर मी सेवा करतांना ‘गुरुदेव सूक्ष्मातून माझ्यासमोर बसले आहेत’, असा भाव ठेवू लागलो. तेव्हा मी लिखाण वाचत असतांना ‘गुरुदेव मला सूक्ष्मातून ‘यावर खुणा कर. संपूर्ण परिच्छेद न घेता या दोन ओळींवर खुणा कर’, असे सांगत आहेत’, असे मला अनुभवायला आले. जणू ‘तेच माझ्या समवेत राहून माझ्याकडून ग्रंथासाठी योग्य लिखाणाची निवड करून घेत आहेत’, अशी अनुभूती मला आली. मला त्यातून आनंदही मिळाला.
३. कृतज्ञता
नंतर मला अन्य कात्रणे आणि एक ग्रंथ यांतील लिखाण निवडण्याची सेवा मिळाली. त्या वेळीही गुरुदेवांनी माझ्याकडून अशा प्रकारे सेवा करून घेतली. ‘गुरुदेवांनी या सेवेच्या अंतर्गत मला कार्य आणि साधना या दोन्ही गोष्टी टप्प्याटप्प्याने शिकवल्या आणि माझ्याकडून करून घेतल्या’, त्याबद्दल मी गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’
– श्री. रोहित साळुंके, फोंडा, गोवा. (२३.१.२०२५)
|