महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी गोवा सरकारचा महत्त्वाचा निर्णय

पणजी, ५ मार्च (वार्ता.) – गोवा सरकारच्या उद्योग खात्याने महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी औद्योगिक विकास महामंडळातील (आय.डी.सी.) ३० टक्के भूखंड महिलांना देण्याचा निर्णय घेतला आहे. महामंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत हा ठराव संमत झाल्याची माहिती उद्योगमंत्री मावीन गुदिन्हो यांनी दिली. ‘असोचॅम’, ‘नाबार्ड’ आणि केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (‘एम्.एस्.एम्.ई.’ – मायक्रो,
स्मॉल अँड मिडियम एंटरप्रायझेस) मंत्रालय यांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात मंत्री मावीन गुदिन्हो यांनी ही माहिती दिली. याप्रसंगी डॉ. सागर साळगावकर, मांगरिष पै रायकर, एम्.के. मीना आणि संदीप धारकर यांची उपस्थिती होती.
मंत्री मावीन गुदिन्हो पुढे म्हणाले, ‘‘नाबार्ड’, ‘एम्.एस्.एम्.ई.’ आणि गोवा राज्यातील उद्योग खाते यांनी स्वत:हून ग्रामीण भागात जाऊन तेथील उद्योजकांना साहाय्य केले पाहिजे. ‘उद्योजक आपल्याकडे साहाय्य मागण्यासाठी येतील’, ही मानसिकता सोडली पाहिजे. ‘एम्.एस्.एम्.ई.’ क्षेत्रात महिलांना पुष्कळ वाव आहे. राज्यातील ग्रामीण भागातील महिलांमध्ये विविध खाद्यपदार्थ बनवण्याचे कौशल्य आहे. या कौशल्याचे
रूपांतर व्यवसायात झाले पाहिजे. महिला आणि युवक यांनी उद्योजक बनण्यासाठी केंद्र अन् राज्य सरकार यांच्या विविध योजनांचा लाभ घेतला पाहिजे. विकसित भारत २०४७ चे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता आहे. गोव्यात २ विमानतळे, बंदर, रेल्वे आणि चांगले रस्ते, अशा सोयी आहेत. उद्योजकांनी याचा लाभ घ्यावा.’’