४ मार्च या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘काँग्रेसच्या इंदिरा गांधी यांनी काढलेले गौरवोद्गार, संपूर्ण स्वातंत्र्याचा उद्घोष करणारे पहिले नेते, सावरकर यांच्या निवेदनाचा गर्भितार्थ अन् म. गांधी आणि सावरकर यांच्या सत्याग्रहाच्या भूमिकेतील भेद’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा अंतिम भाग येथे दिला आहे.
७. सावरकर यांच्या सुटकेनंतर सर्व पक्षांकडून सभांचे आयोजन आणि म. गांधींनी घरी जाऊन केलेला त्यांचा सत्कार
सावरकर यांनी केलेल्या सुटकेच्या अर्जाला ‘माफीनामा’ संबोधून कुचेष्टा करणार्या आजच्या विदूषकांनी हे समजून घेतले पाहिजे की, सावरकर यांच्या सुटकेनंतर त्यांच्या अभिनंदनाच्या ज्या प्रचंड सभा झाल्या त्या सर्वपक्षीय होत्या ! त्यात काँग्रेसही सहभागी झाली होती ! आज सावरकर यांच्यावर भुंकणार्या आणि थोबाड सुख घेणारे काँग्रेसचे मणीशंकर अय्यर, राहुल गांधी यांच्यापेक्षा ९० वर्षांपूर्वीच्या काँग्रेसच्या पुढार्यांना अर्थातच सावरकर आणि त्यांची सुटका हे विषय अधिक समजत होते. ज्या वेळी रत्नागिरीला पोचणे कठीण होते, त्या वेळी सावरकर कारागृहातून सुटून रत्नागिरीला आहेत; म्हणून वर्ष १९२७ मध्ये स्वतः म. गांधींनी कस्तुरबांसह सावरकर यांच्या घरी जाऊन त्यांचा सत्कार केला होता ‘देशवीर’ म्हणून ! राहुल गांधींपेक्षा म. गांधींना अधिक अक्कल होती, हे कुणीही काँग्रेस पुढारी मान्य करील !
८. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या निवृत्तीवेतनाच्या (‘पेन्शन’च्या) मागील वास्तव
‘माफीनामा’ प्रकरणाचा हा खुलासा झाल्यानंतर ‘सावरकर यांना प्रतिमाह ६० रुपये निवृत्तीवेतन (पेन्शन) ब्रिटीश सरकार देत असे; म्हणून ते ब्रिटिशांचे हेर होते’, हा धादांत खोटा प्रचार बेशरमीची सीमा ओलांडून काँग्रेसकडून केला जात आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अटक होऊन त्यांची कारागृहात रवानगी झाली. त्या वेळी सरकारने सावरकर यांचे नाशिक जिल्ह्यातील भगूर गावातील त्यांचे घर, शेतीवाडी इत्यादी संपत्ती राजहृत (जप्त) केली होती. पुढे सावरकर यांना शिक्षा झाली, त्यानंतर ती सर्व संपत्ती लिलाव करून िवकली. कारागृहातून सुटका झाल्यानंतर ज्या आरोपीची संपत्ती लिलाव करून विकली, त्यांच्या उपजीविकेचे दायित्व अर्थात् सरकारनेच कारवाई केल्यामुळे सरकारवर पडते. त्यामुळे सावरकर यांना प्रतिमहा ६० रुपये निवृत्तीवेतन देण्यात आले. वास्तविक सावरकरांसारख्या असामान्य बुद्धीवंतांनी वकिली केली असती, तर प्रतिदिन सहस्रो रुपये मिळवले असते; परंतु त्यांची वडिलोपार्जित संपत्ती लिलाव केली आणि त्यांनी मिळवलेली वकिलीची सनद जप्त करण्यात आली. हे अल्प झाले म्हणून कि काय, मुंबई विश्वविद्यालयाने सरकारला खूश करण्याकरता त्यांची ‘बी.ए.’ची पदवीही (कला शाखेची पदवी) जप्त केली ! (‘बी.ए.’ची पदवी विश्वविद्यालयाने परत घेतल्याचे बहुधा इतिहासातील हे एकमेव उदाहरण असावे !) अशा वेळी सरकारचे दायित्व होते त्यांचे पोषण करण्याचे ! कारागृहामध्ये गेल्यानंतर बंदीवानाला जेवण देण्याचे जसे सरकारचे कर्तव्य ठरते, तसे सर्व उपजीविकेच्या साधनांची जप्ती केल्यानंतर त्यांची उपजीविका चालवण्याचे दायित्व सरकारचेच पडते. या ठिकाणी कुठेही हेरगिरी करण्याच्या मोबदल्याचा प्रश्नच नाही ! त्या वेळी हे सूत्र कुणाला खुपलेही नाही. श्रीनिवास शास्त्रींसारखे काँग्रेसचे त्या वेळचे पुढारी सावरकर यांच्या भेटीस येत. सावरकर यांच्या अगदी भाड्याच्या घरात रहाण्याच्या काटकसरी संसाराकडे पाहून त्यांनी हळहळ व्यक्त केली; पण कुणाच्याही डोक्यात त्या वेळी सावरकरांविषयी ‘इंग्रज सरकारचा हेर, हा सडक्या मेंदूतच उत्पन्न होऊ शकणारा विचार’, असा आला नाही.
८ अ. सावरकर यांच्यावर सुटकेनंतर विविधांगी टीका होणे; पण कुणीही ‘माफी’ आणि ‘पेन्शनर सावरकर हेर’, असे न संबोधणे : ‘सावरकर आपल्या पक्षात यावे’, असे सर्वपक्षीयांना वाटत होते. ‘त्यांच्यासारखा अमोघ वक्ता एवढे ज्याच्या मागे वलय आहे’, असा महान नेता ज्या पक्षाला लाभतो, त्याचे दिवस निश्चितच चांगले आले असते. हिंदु महासभा ही बहुसंख्य हिंदूंची बाजू घेणारी असल्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी पुढे तिचे अध्यक्षपद सांभाळले. सावरकर जर काँग्रेसमध्ये गेले असते, तर सहज अध्यक्ष झाले असते. सर्व मानसन्मान, पैसा विनासायास पिढ्यान्पिढ्या मिळण्याची सोय होती; पण त्यांनी त्यासाठी त्यांच्या तत्त्वांना मुरड घातली नाही. हिंदु महासभेचे अध्यक्ष झाल्यावर पुढे त्यांनी भारतभर जो झंझावाती प्रचार केला, त्या वेळीही पक्षीय व्यवस्थेप्रमाणे त्यांच्यावर टीका पुष्कळ झाली ती संकुचित, प्रतिगामी या दृष्टीकोनातून ! त्या वेळी काँगे्रसमध्येही मोठमोठे नेते आणि मुलूखमैदानी वक्ते होते; पण कुणीही सावरकर यांची ‘माफी’ आणि ‘पेन्शनर सावरकर हेर’, हे कधी म्हटले नाही. नाही म्हणायला काँग्रेसच्या गणेश शंकर विद्यार्थी यांनी लेख लिहून ‘हुतात्मा अंदमानात का मेले नाहीत ?’, या शीर्षकाखाली टीका केली होती; पण त्यांनीही ‘माफी मागितली’, हे म्हटले नाही. ‘केवळ सुटण्याची खटपट करण्यापेक्षा खरा सत्याग्रही म्हणून अंदमानात मरून जायला पाहिजे होते’, एवढेच लेखात म्हटले होते. त्यावर सावरकर यांनी वर्तमानपत्रातूनच उत्तर देऊन ‘देशहिताकरता देशकार्य महत्त्वाचे, केवळ शत्रूच्या हाती पडून मरून जाणे, म्हणजे देशकार्य नव्हे’, हे स्पष्ट केले होते. त्याचप्रमाणे ‘राजकारण आणि मुत्सद्देगिरी, म्हणजे आपण सुटून शत्रूला कारागृहात डांबणे, हे होय’, हेही सांगितले.
९. ‘सावरकर थोर देशभक्त आहेत’, हे पंडित नेहरू यांनी मान्य करणे
१० मे १९५७ या दिवशी ‘१८५७ च्या लढ्या’ची शतसंवत्सरी (१०० वर्षे) साजरी करण्याचा कार्यक्रम हिंदु सभेचे खासदार प्रा. वि.घ. देशपांडे यांनी आखला. त्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मुद्दाम देहलीत बोलावून त्यांच्या अध्यक्षतेखालीच हा कार्यक्रम करण्याचे ठरले. या कार्यक्रमाचे निमंत्रण द्यायला प्रा. वि.घ. देशपांडे पंडित नेहरूंकडे गेले. त्या वेळी नेहरू म्हणाले, ‘मी सावरकर यांचे १८५७ वरील पुस्तक इंग्लंडमध्ये विद्यार्थी असतांना वाचले आहे. त्या वेळी त्या पुस्तकाने माझ्यावर पुष्कळ प्रभाव पाडला. सावरकर थोर देशभक्त आहेत. लढाऊ आहेत. त्यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होत आहे, ही फार समाधानाची गोष्ट आहे; पण सावरकर यांच्या आणि माझ्यामध्ये तात्त्विक मतभेद आहेत. मी येऊन माझ्या भाषणांत वेगळा सूर लागला, तर त्यांना अवघडल्यासारखे होईल; म्हणून मी येत नाही. कार्यक्रमाच्या यशाकरता माझ्या शुभेच्छा !’
१०. क्रिप्स यांना बौद्धीक आपटी दिल्याने पंडित नेहरू यांनी सावरकर यांचे दैनिक ‘नॅशनल हेराल्ड’मधून केलेले कौतुक !
‘भारताला स्वातंत्र्य कसे द्यायचे ?’, याची योजना आखण्याकरता क्रिप्स नावाचा मुत्सद्दी भारतात आला होता. अतिशय बुद्धीमान अधिवक्ता असणारा क्रिप्स हा जर्मनी आणि रशिया यांचा आपापसांत कलह लावण्यात यशस्वी झाला होता. भारतीय पुढार्यांना तर त्याने आपल्या मुत्सद्दी जाळ्यात सहज अडकवले. हिंदु सभेच्या शिष्टमंडळाशी भेट घेण्याच्या प्रसंगी सावरकर यांच्याशी त्याची बौद्धीक झटापट होऊन त्याला जी आपटी खावी लागली ती पूर्ण विस्तार भयास्तव देता येत नाही; पण यावर पंडित नेहरूंच्या प्रभावाखाली असलेल्या ‘नॅशनल हेराल्ड’ या दैनिकाने लिहिले होते, ‘‘सावरकर आणि आमच्यामध्ये फार मोठे राजकीय मतभेद आहेत; पण क्रिप्सच्या भेटीत त्यांनी क्रिप्सला बौद्धीक आपटी देऊन जी देशसेवा केली तिला तोड नाही. सर्व देशाने यासाठी सावरकर यांचे आभार मानले पाहिजेत. क्रिप्सला तर या आपटीची जन्मभर आठवण राहील !’ ‘माफीवीर’ म्हणून हिणवणार्या सावरकर यांचे राहुल गांधी यांचे पणजोबा, म्हणजे पंडित नेहरू यांनी केलेले हे परीक्षण !
११. वर्ष १९६५ च्या भारत-पाक युद्धाच्या वेळी भारताच्या विजयाच्या बातम्या कळाव्यात; म्हणून तत्कालीन पंतप्रधान आणि काँंग्रेस नेते लालबहादूर शास्त्री यांनी सावरकर यांच्या खोलीत रेडिओ लावून भारताच्या विजयाच्या बातम्या कळवण्याची सोय केली होती.
१२. सावरकर यांनी मराठी साहित्य संमेलनात दिलेला संदेश आणि त्यावरून त्यांच्यावर ‘रिक्रुट ऑफीसर’ म्हणून झालेली टीका
बडोदा येथील मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद सावरकर यांना देण्यात आले. त्या वेळी त्यांनी त्यांचा गाजलेला संदेश ‘लेखकांनो ! लेखण्या मोडा आणि बंदुका हाती घ्या !’ हा वर्ष १९४२ च्या पूर्वीच दिला होता, हे मुद्दाम लक्षात घ्यावे. सावरकर यांनी आणि हिंदु महासभेच्या पुढार्यांनी ही सैन्यभरती आंदोलन चालवल्यासमवेत काँग्रेसचे पुढारी काही मत्सराने आणि बरेचसे झापडबंद अज्ञानाने सावरकर यांना ‘रिक्रुट ऑफीसर’ (भरती अधिकारी) म्हणू लागले. त्यांना सावरकर यांची यामागची द्रष्टेपणाची दृष्टी कळू शकली नाही. हिंदु महासभेच्या इतर पुढार्यांनी सैन्य भरतीसाठी दौरे काढले. डॉ. मुंजे यांनी नाशिक येथे पहिली सैनिकी शाळा ‘भोसला मिल्ट्री स्कूल’ स्थापन केली. त्या वेळी भाषणात डॉ. मुंजे नेहमी सांगायचे, ‘जिसकी लाठी उसकी भैंस । जिसकी फौज उसका राज ।’ (बलवान व्यक्तीचा विजय होतो आणि ज्याच्याकडे सैन्य त्याचे राज्य असते.) या पक्षीय धामधुमीत वर्ष १९४२ चे आंदोलन पेटले, काही काळ धगधगले आणि शेवटी दडपले गेले. पुन्हा लोकांमध्ये निराशा-विषण्णता ! म. गांधीच्या त्या वेळेच्या शब्दांत सांगायचे तर ‘देअर इज डार्क इन ॲटमासफिअर !’ (वातावरण अंधःकाराने कुंद झाले आहे !) आज केवढाही वर्ष १९४२ च्या आंदोलनाचा उदो उदो करा; पण त्या वेळी सर्व मोठ्या पुढार्यांची निराशा होती.
(समाप्त)
– श्री. श्रीश हळदे
(साभार : त्रैमासिक ‘प्रज्ञालोक’)
संपूर्ण स्वातंत्र्याचा उद्घोष करणारे पहिले नेते स्वातंत्र्यवीर सावरकर
काँग्रेसचे खासदार राहुल गांधी लोकसभेत म्हणत होते, ‘‘हमारी तरफ शहिदोंकी रांगे लगी थी । तुम्हारे सावरकर इंग्रजोंकी माफी मांग रहे थे ।’’ पोरकटपणा, भारतीय इतिहासाचे गडद अज्ञान, लाडावलेल्या श्रीमंताच्या मुलांमध्ये दिसावा तसा उन्मत्त बेदरकारपणा या सर्व गुणांचे मिश्रण राहुल यांच्या देहबोलीतून उमटत होते. या सगळ्यातून स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे चारित्र्यहनन करण्याविषयीची मोहीमच अर्थात् षड्यंत्रच काँग्रेसवाल्यांनी उघडल्याचे दिसून येते. या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्यवीर सावरकर हे विविधांगाने कसे महान होते आणि काँग्रेसचेच नेहरू अन् इंदिरा गांधी यांनी त्यांच्याविषयी काढलेले गौरवोद्गार येथे दिले आहे.
संपादकीय भूमिकास्वातंत्र्यवीर सावरकर यांचा वारंवार अवमान करणारे काँग्रेसचे नेते हे कठोर शिक्षेस पात्र ! |