वेंगुर्ला – तालुक्यातील मिठागरवाडी आणि केरवाडी (शिरोडा) येथे बांधलेले मातीचे संरक्षक बंधार्यांना भगदाड पडल्याने मिठागरवाडीतील मिठागरात अन् केरवाडी येथील शेतभूमी आणि माड बागायती यांमध्ये समुद्राच्या उधाणाचे पाणी घुसल्याने मोठी हानी झाली आहे.
मिठागरवाडी खारभूमी येथील बंधार्यासह अनुमाने ३० वर्षे पूर्ण होत आली आहेत. त्यामुळे हा बंधारा अत्यंत जीर्ण झाला असून खारभूमी विभागाकडून किरकोळ स्वरूपात दुरुस्ती करण्यात आली होती. ३ आणि ४ मार्च या दिवशी समुद्राला अचानक आलेल्या उधाणामुळे ही हानी झाली आहे. केरवाडी येथे काही वर्षांपूर्वी खारभूमी विकास विभागाने बंधारा बांधला होता. या घटनेनंतर राऊतवाडी आणि टेंमवाडी येथील शेतकरी अन् मीठ व्यावसायिकांनी श्रम घेऊन जेसीबीच्या साहाय्याने पाणी अडवून शेतभूमीचे संरक्षण करण्यासाठी प्रयत्न केले. ४ मार्च या दिवशी दुपारी खारभूमी विकास विभागाच वेंगुर्ला उपविभागाचे अभियंता भालचंद्र पाटील आणि सहकार्यांनी तातडीने या भागाची पहाणी केली.
येथील शेतकरी श्री. लक्ष्मण (आबा) राऊत यांनी विभागाच्या उपविभागीय अधिकारी सौ. माईणकर यांच्याशी भ्रमणध्वनीवरून चर्चा केली अन् तातडीने पहाणी करून उपाययोजना करण्याची मागणी केली.