मराठीला राजभाषेचा दर्जा मिळवण्यासाठी निर्णायक लढ्याची रूपरेषा निश्चित

पर्वरी येथे मराठीप्रेमींची बैठक

पणजी, ४ मार्च (वार्ता.) – शासकीय पातळीवरून मराठीवर सातत्याने होणारा अन्याय कायमस्वरूपी दूर करायचा असेल, तर मराठीला तिच्या हक्क्काचा राजभाषेचा दर्जा मिळायला हवा. यासाठी आवश्यक निर्णायक लढ्याची रूपरेषा ठरवण्यात आली आहे. मराठीला राजभाषेचा दर्जा प्राप्त व्हावा, यासाठी गेली अनेक दशके प्रयत्नशील असलेले गो.रा. ढवळीकर यांच्या अध्यक्षतेखाली मराठी राजभाषा व्हावी, अशी तीव्र इच्छा असलेल्या निवडक कार्यकर्त्यांच्या बैठकीत ही रूपरेषा ठरवण्यात आली. पर्वरी येथील गोमंतक मराठी अकादमीच्या कार्यालयात नुकतीच ही बैठक झाली.

सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रांमध्ये गेली अनेक वर्षे कार्य करणारे कुशल संघटक प्राचार्य सुभाष वेलिंगकर यांनी ही बैठक बोलावली होती. या बैठकीला गोमंतक मराठी अकादमीचे अध्यक्ष प्रदीप घाडी आमोणकर, ‘मराठी आमुची मायबोली’चे निमंत्रक प्रकाश भगत, ज्येष्ठ पत्रकार गुरुदास सावळ यांची व्यासपिठावर उपस्थिती होती. बैठकीला डॉ. अनुजा जोशी, शिक्षणतज्ञ गोविंद देव, मराठी राजभाषा आंदोलनातील ज्येष्ठ कार्यकर्त्या अनुराधा मोघे, रोशन सामंत, साहित्यिक तथा निवृत्त प्राचार्य गजानन मांद्रेकर, राष्ट्रीय बजरंग दलाचे गोवा प्रमुख नितीन फळदेसाई, प्राचार्य संदीप पाळणी, वाळपईचे अधिवक्ता शिवाजी देसाई, गोमंतक मराठी परिषदेचे अध्यक्ष डॉ. मधु घोडकिरेकर, मराठी राज्यभाषा प्रस्थापन समितीचे मच्छिंद्र च्यारी आदींची उपस्थिती होती. या चळवळीचे राज्य निमंत्रक या नात्याने प्रा. सुभाष वेलिंगकर यांची टाळ्यांच्या गजरात एकमताने निवड करण्यात आली.

आज मराठी राजभाषेसाठी याचना करण्याची पाळी मराठीप्रेमींवर आली ! – गो.रा. ढवळीकर

बैठकीच्या प्रारंभी गो.रा. ढवळीकर यांनी मराठी राजभाषा व्हावी, यासाठी गेली सुमारे ४० वर्षे चालू असलेल्या लढ्यातील महत्त्वाच्या घटना विशद केल्या. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने मराठीची कास सोडल्याने आज मराठी राजभाषेसाठी याचना करण्याची पाळी आल्याचे ते पुढे म्हणाले.

कोकणीला रोमी लिपी देणे हे अराष्ट्रीय ! – प्रा. सुभाष वेलिंगकर

बैठकीचे निमंत्रक सुभाष वेलिंगकर म्हणाले, ‘‘हिंदूंच्या मतांवर निवडून आलेल्या राजकारण्यांनी मराठी राजभाषा आंदोलनात कच खाल्ली. कोकणीला रोमी लिपी देणे, हे अराष्ट्रीय आहे, तसेच त्या मोबदल्यात मराठीला राजभाषेचा दर्जा देण्याचा सौदा ही मराठीशी केलेली प्रतारणा ठरणार आहे. कोकणीशी आमचे वैर नाही, तर राजभाषेचा दर्जा हा मराठीचा हक्क आहे.’’

गोमंतक मराठी अकादमीचे अध्यक्ष प्रदीप घाडी आमोणकर यांनी मराठी राजभाषा आंदोलनासाठी गोमंतक मराठी अकादमी सर्वतोपरी साहाय्य करणार, अशी ग्वाही दिली. बैठकीच्या अखेर ऋणनिर्देश करतांना कुशल संघटक प्रा. सुभाष वेलिंगकर यांच्या नेतृत्वाखाली चालू होणारा हा लढा निर्णायक लढा असून मराठीला राजभाषेचा दर्जा मिळाल्यानंतरच तो थांबणार असल्याचे सांगितले. या विषयात पूर्ण राज्यात जागृती करण्याचा, तसेच मार्च मासाच्या शेवटच्या आठवड्यात राज्यातील प्रमुख कार्यकर्त्याचा मेळावा आयोजित करण्याचे या वेळी ठरवण्यात आले.