
पणजी, ४ मार्च (वार्ता.) – मनुष्यबळ विकास महामंडळाच्या वतीने विविध खात्यांमध्ये काम करणार्या कर्मचार्यांना पुढील मासापासून ३ ते ५ सहस्र रुपये वेतनवाढ लागू करण्यात येणार आहे. कर्मचार्यांच्या वेतनाचा सेवा कर सरकार भरणार आहे, तसेच चांगली पार्श्वभूमी असलेल्या कर्मचार्यांना प्रशिक्षण कालावधीनंतर २ वर्षांत कायम केले जाणार आहे. महिला कर्मचार्यांना ६ मास वेतनासह मातृत्व रजा दिली जाणार आहे, अशा महत्त्वाचा घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केल्या. सांखळी येथे गोवा मनुष्यबळ विकास महामंडळाच्या वर्धापनदिन कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत बोलत होते. या वेळी व्यासपिठावर महामंडळाचे अध्यक्ष तथा आमदार रुडॉल्फ फर्नांडिस, व्यवस्थापकीय संचालक गुरुदास देसाई आदींची उपस्थिती होती.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पुढे म्हणाले, ‘‘वेगवेगळ्या सरकारी खात्यांमध्ये महामंडळाच्या वतीने सुरक्षारक्षक, शिपाई, स्टेनो, कारकून, तसेच
अन्य पदांवर अनेक जण काम करत आहेत. त्यांच्यावर सरकार अन्याय होऊ देणार नाही. पोलीस, वन आणि अग्नीशमन दल येथे या कर्मचार्यांना १० टक्के राखीव जागा दिल्या जाणार आहेत. या कर्मचार्यांच्या पुढील शिक्षणासाठी वार्षिक १० सहस्र रुपये शैक्षणिक शुल्क सरकार भरणार आहे. कर्मचार्यांना ३ टक्के वेतनवाढ दिली जाणार आहे. विनावेतन सुटी घेऊन २ वर्षांपर्यंत विदेशात जाऊन नोकरी करून परत येथे रूजू होण्याची संधीही त्यांना प्राप्त होणार आहे. या कर्मचार्यांना गृह कर्ज आणि बोनस देण्याचा विचार आहे. येत्या अर्थसंकल्पात
यांसंबंधी घोषणा केली जाणार आहे. सध्या या कर्मचार्यांची संख्या ४ सहस्र आहे आणि वर्ष २०२७ पर्यंत ही संख्या दुप्पट होऊन ८ सहस्रांवर पोचणार आहे. या कर्मचार्यांच्या वेतनावर १८ टक्के वस्तू आणि सेवा कर लागतो. त्यामुळे त्यांचे वेतन वाढवले जाणार आहे. सर्वांनी प्रामाणिकपणा आणि सुरक्षितता अवलंबल्यास गोवा स्वयंपूर्ण होण्यास वेळ लागणार नाही.’’