कांदोळी (गोवा) येथे महाराष्‍ट्रातील आमदार अबू आझमी यांचा मुलगा फरहान आझमी याने स्‍थानिकांना बंदूक दाखवून धमकावले !

आझमी याच्‍यासह चौघांच्‍या विरोधात गुन्‍हा नोंद

म्‍हापसा, ४ मार्च (वार्ता.) – कांदोळी येथे चारचाकी वाहनाचा दिशादर्शक दिवा (इंडिकेटर) न दाखवल्‍याच्‍या कारणावरून स्‍थानिक लोकांशी रस्‍त्‍यावर घडलेल्‍या वादाच्‍या वेळी समाजवादी पक्षाचे नेते आणि महाराष्‍ट्रातील मानखुर्द शिवाजीनगरचे आमदार अबू आझमी यांचा मुलगा फरहान आझमी याने लोकांना बंदूक दाखवून धमकावले. या प्रकरणी पोलिसांत तक्रार केल्‍यानंतर फरहान आझमी याच्‍यासह ४ जणांच्‍या विरोधात कळंगुट पोलिसांनी गुन्‍हा नोंद केला आहे. गुन्‍हा नोंद केलेल्‍यांमध्‍ये फरहान आझमी, शाम, झियोन फर्नांडिस आणि जोसेफ फर्नांडिस या व्‍यक्‍तींचा समावेश आहे.

यासंबंधी मिळालेल्‍या माहितीनुसार ३ मार्चला मध्‍यरात्रीच्‍या सुमारास कांदोळी येथील न्‍यूटन सुपर मार्केटसमोर एका आलिशान चारचाकी वाहनामध्‍ये असलेल्‍या फरहान आझमी आणि इतरांनी चारचाकी वाहनाचा दिशादर्शक दिवा (इंडिकेटर) न दाखवता वळण घेतल्‍याच्‍या कारणावरून स्‍थानिक लोकांचा त्‍यांच्‍याशी वाद चालू झाला आणि नंतर त्‍याचे पर्यवसान मारामारीत झाले. या वेळी फरहान आझमी याने स्‍वतःकडील बंदूक काढून धमकावल्‍याची लोकांनी तक्रार केली. कळंगुट पोलिसांना याची माहिती मिळताच त्‍यांनी त्‍वरित घटनास्‍थळी धाव घेऊन फरहान आणि त्‍याच्‍याबरोबर असलेल्‍या तरुणांना कह्यात घेतले. त्‍यांच्‍या विरोधात पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्‍या १९५, तसेच ३५ या कलमांखाली गुन्‍हा नोंद केला आहे. या प्रकरणी पुढील अन्‍वेषण चालू आहे. पोलिसांनी केलेल्‍या अन्‍वेषणामध्‍ये फरहान याच्‍याजवळ असलेल्‍या बंदुकीला योग्‍य परवाना असल्‍याचे आढळून आले. फरहान हा हिंदी चित्रपटातील अभिनेत्री आयेशा टाकिया हिचा पती आहे.