‘या आधीच्या लेखात ४.३.२०२५ या दिवशी आपण ‘साधिकेने तिच्या दिरांच्या आजारपणात साधनेच्या संदर्भात कसा विचार करायचा ?’, याविषयी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्याकडून घेतलेले मार्गदर्शन आणि त्यानुसार कसे प्रयत्न केले’, यांविषयी जाणून घेतले. या लेखात ‘साधिकेने तिच्या दिरांना साधनेविषयी सांगणे आणि त्यामुळे साधिकेच्या दिरांमध्ये झालेले सकारात्मक पालट’ यांविषयी जाणून घेऊया.
(भाग २)
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/889498.html

५. दिरांना साधनेविषयी सांगणे
५ अ. दिरांना साधनेच्या संदर्भात सांगतांना ‘एका जिवाला साधनेचे महत्त्व सांगत असून त्या जिवाच्या अंतर्मनापर्यंत साधनेचे बीज जाणार आहे’, असा विचार येणे : ‘मी काही वेळा दिरांशी बोलत असतांना त्यांना साधनेच्या संदर्भात काही सूत्रे सांगत होते. मी सूत्रे सांगत असतांना माझ्या मनात ‘मी दिरांना सांगते’, असा विचार नसायचा. त्या वेळी माझ्या मनात ‘मी एका जिवाला साधनेचे महत्त्व सांगत असून त्या जिवाच्या अंतर्मनापर्यंत साधनेचे बीज जाणार आहे’, असा विचार असे. मी त्यांना तुमच्या लहान भावाने (माझ्या यजमानांनी, आताचे कै. अरविंद गाडगीळ, आध्यात्मिक पातळी ६४ टक्के) कशी साधना करून प्रगती करून घेतली’, याविषयी काही सूत्रे सांगत असे.
५ आ. दिरांना साधनेविषयी सांगतांना ‘साधनेचा विचार नकळत जिवावर बिंबतोच’, यावर साधिकेची दृढ श्रद्धा असणे आणि याचा परिणामही पुष्कळ चांगला होणे : मी साधनेची सूत्रे सांगत असतांना दिरांना काही पटले नाही, तर ते दुसरा विषय काढून बोलायचे. मला वाटायचे, ‘ते आपल्या घरी आले आहेत, तर मी त्यांना साधनेविषयी काहीच सांगितले नाही’, असे व्हायला नको.’ ‘एखाद्या जिवाला साधना सांगितल्यावर त्या जिवाच्या मनात साधनेचा विचार नकळत बिंबतोच’, यावर माझी पूर्ण श्रद्धा होती. याचा परिणामही पुष्कळ चांगला झाला.
६. ‘प.पू. फडकेआजींमधील चैतन्यामुळे त्यांनी वापरलेल्या वस्तूंत पालट झाले’, हे दिरांना जाणवणे
एक दिवस दीर प.पू. फडकेआजींच्या (माझी आई, सनातनच्या पहिल्या संत प.पू. (कै.) विमल फडके यांच्या) खोलीत आले. त्यांनी प.पू. फडकेआजी आणि प.पू. डॉ. आठवले यांच्या छायाचित्रांना नमस्कार केला. तेव्हा मी त्यांना सांगितले, ‘‘मी तुम्हाला प.पू. फडकेआजींनी वापरलेली जपमाळ दाखवते.’’ तेव्हा ‘ती जपमाळ हलकी झाली आहे’, हे दिरांच्याही लक्षात आले. त्यानंतर त्यांनी प.पू. आजींच्या सर्व वस्तू पाहिल्या. ‘त्या वस्तूंत चैतन्यामुळे पालट झाले आहेत’, हे दिरांना काही प्रमाणात समजले.
७. भौतिकोपचार तज्ञ दिरांकडून व्यायाम करून घेण्यासाठी घरी येणे
एक भौतिकोपचार तज्ञ (फिजिओथेरेपिस्ट) प्रतिदिन दिरांकडून व्यायाम करून घेण्यासाठी येत असत. ते दिरांकडून एका खोलीतून दुसर्या खोलीत चालण्याचा व्यायाम करून घेत असत.
७ अ. दिरांनी भौतिकोपचार तज्ञांना प.पू. (कै.) श्रीमती विमल फडकेआजी आणि त्यांचे कुटुंबीय यांच्याविषयी आदराने सांगणे : एक दिवस दीर व्यायाम म्हणून चालत असतांना ते प.पू. (कै.) फडकेआजींच्या खोलीत आले. तेव्हा दिरांनी त्या भौतिकोपचार तज्ञांना सांगितले, ‘‘ही खोली सनातनच्या पहिल्या संत प.पू. फडकेआजी यांची आहे. त्या माझ्या भावाच्या सासूबाई होत्या. ही (माझ्याकडे पाहून) प.पू. फडकेआजींची मुलगी आहे. यांच्या कुटुंबातील सर्व जण सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधना करतात. त्यांचे गुरु परात्पर गुरु डॉ. आठवले आहेत. मला साधनेतील काही समजत नाही.’’ हे संभाषण ऐकून ‘दीर काही प्रमाणात सकारात्मक झाले आहेत’, हे माझ्या लक्षात आले. त्यांच्यातील हा पालट पाहून मला प.पू. डॉक्टरांप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटली.
८. दीर त्यांच्या घरी गेल्यानंतर त्यांची प्रकृती खालावणे
दिरांच्या गुडघ्याच्या शस्त्रकर्मानंतर त्यांच्या प्रकृतीत फारशी सुधारणा झाली नव्हती. दीर त्यांच्या घरी गेल्यानंतर त्यांची प्रकृती अकस्मात् खालावली. ३०.३.२०२४ या दिवशी माझे गोव्याला येण्याचे तिकीट होते. २९.३.२०२४ या दिवशी सकाळी आधुनिक वैद्यांनी मला सांगितले, ‘‘तुमच्या दिरांना फुप्फुसाचा कर्करोग (कॅन्सर) झाला असून तो शेवटच्या टप्प्याला आहे.’’ त्या वेळी निनादने (मुलाने) मला सांगितले, ‘‘तू उद्या गोव्याला जाण्यासाठी निघ. सर्वांनीच थांबून काय करायचे ? तुझी सेवा तिकडे चालू राहील. काही लागले, तर कळवीन.’’
९. साधिकेला तिच्या दिरांच्या विचारांत जाणवलेला सकारात्मक पालट
७.४.२०२४ या दिवशी निनादने माझ्या दिरांना सांगितले, ‘‘काका, तुम्हाला कॅन्सर झाला आहे.’’ तेव्हा ते म्हणाले, ‘‘म्हणजे आता सर्व संपले. मनीषाला (साधिकेला) काही सांगू नकोस. तिला सेवा सोडून यायला नको. तुमचा सर्वांचा वेळ जातच आहे.’’ या पूर्वी दीर ‘सेवा सोडून येऊ नकोस’, असे कधीच म्हणाले नव्हते. (नंतर १८.४.२०२४ या दिवशी दिरांचे निधन झाले.)
१०. साधना करण्याचे जाणवलेले महत्त्व
घरात दिरांच्या आजारपणाचे वातावरण असूनही गुरुकृपेने आम्हा कुटुंबियांना कुणालाही ताण आला नाही. दिरांच्या आजारपणात मला माझा मुलगा श्री. निनाद, माझी सून सौ. तनुजा गाडगीळ (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय ३८ वर्षे), मुलगी सौ. नम्रता दिवेकर आणि जावई श्री. राजेंद्र दिवेकर या सर्वांनी पुष्कळ साहाय्य केले. सर्व जण सकारात्मक असल्यामुळे सर्वांनाच दिरांची सेवा आनंदाने करता आली. घरातील सर्वांचीच सेवा आणि साधना चालू होती. माझी जाऊ (श्रीमती लीना गाडगीळ, वय ६५ वर्षे) माझ्या दिरांच्या निधनानंतर नियमित नामजप करू लागली.
‘आपण कुठेही असलो किंवा प्रसंग कोणताही असू दे, साधनेमुळे त्याला सहजतेने सामोरे जाता येते’, हे केवळ सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधना केल्यानेच शक्य झाले’, असे आमच्या लक्षात आले.
११. कृतज्ञता
दीर आमच्या घरी राहिले असतांना ‘आमच्या घरात प.पू. डॉक्टरांचे सूक्ष्मातून असलेले अस्तित्व आणि प.पू. (कै) श्रीमती फडकेआजींचे सूक्ष्मातील चैतन्य’ यांमुळे दिरांच्या विचारांत केवळ १ मासात प.पू. डॉक्टरांच्या कृपेने पालट झाला’, असे मला वाटते. सद्गुरु गाडगीळकाकांच्या मार्गदर्शनामुळे माझ्यात सेवाभावाची जाणीव टिकून रहाण्यास पुष्कळ साहाय्य झाले. त्यातून मला पुष्कळ आनंद मिळाला. त्याबद्दल मी प.पू. डॉक्टर आणि सद्गुरु गाडगीळकाका यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
(समाप्त)
– श्रीमती मनीषा गाडगीळ (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ६३ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२.१.२०२५)
|