श्री तुळजाभवानीदेवी मंदिरातील दागिन्यांच्या अपहार प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश द्यावेत ! – किशोर गंगणे

प्रकरण दाबण्याचा प्रयत्न चालू राहिल्यास जनआंदोलन उभे करण्याची चेतावणी

धाराशिव – श्री तुळजाभवानीदेवी मंदिरातून चोरीला गेलेले देवीचे ऐतिहासिक दागिने आणि मौल्यवान वस्तू चोरी प्रकरणात शासन आणि प्रशासन यांच्याकडून योग्य दिशेने प्रयत्न होतांना दिसत नाहीत. हे प्रकरण कोट्यवधी देवीभक्तांच्या भावनांशी संबंधित असल्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांनी तात्काळ सीआयडी चौकशीचे आदेश द्यावेत, अशी मागणी जिल्हाधिकारी कीर्ती पुजार यांच्याकडे श्री तुळजाभवानीदेवी पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष श्री. किशोर गंगणे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मंदिरातील भ्रष्टाचार प्रकरणी उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपिठाने संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि ठेकेदार यांच्यावर गुन्हे नोंद करण्याचे आदेश दिले आहेत. देवीचे दागिने सांभाळण्याचे दायित्व महंत चिलोजीबुवा यांच्यावर होते. गुन्हा नोंद झाल्यानंतर चिलोजीबुवा गेले ९ मास पसार आहेत. प्रारंभी त्यांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला होता, तेव्हा त्यांना शोधण्यासाठी, अटक करण्यासाठी पोलीस प्रशासनाने कोणतेही प्रयत्न केल्याचे दिसून येत नाही.

यानंतर बर्‍याच कालावधीनंतर उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपिठाने त्यांचा जामीनअर्ज संमत केला. तोपर्यंत पोलीस प्रशासनाने काही केले नाही, तसेच या विरोधात शासन सर्वाेच्च न्यायालयात गेले नाही. यावरून पोलीस प्रशासन गुन्हेगारांना पाठीशी घालत असल्याचे दिसून येत आहे. गुन्हेगारांना वेळीच पकडण्यात आले असते, तर गहाळ दागिन्यांचा शोध लागला असता आणि कोट्यवधी देवीभक्तांना न्याय मिळाला असता. देवीच्या मंदिरात भ्रष्टाचार करणार्‍यांवर आणि त्यांना पाठीशी घालणार्‍यांवर तात्काळ कारवाई करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या वतीने चौकशीचे आदेश द्यावेत. देवीभक्तांना, न्याय मिळाला नाही, तर मोठे जनआंदोलन उभे करावे लागेल.