आझमींचे सदस्यत्व रहित करून प्रशांत कोरटकर आणि सोलापूरकर यांच्यावरही कारवाई करावी !

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी ! 

डावीकडून अंबादास दानवे आणि अबू आझमी

मुंबई, ४ मार्च (वार्ता.) – प्रशांत कोरटकर यांनी इतिहासकार इंद्रजीत सावंत यांना धमकी दिली. अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य केले. या प्रकरणी ४ मार्च या दिवशी विधान परिषदेच्या सभागृहात मत मांडतांना विरोधी पक्षनेत्यांचा सत्ताधार्‍यांकडून माईक बंद करण्याचा प्रयत्न झाला, असा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला, तसेच ‘प्रशांत कोरटकर, अभिनेते राहुल सोलापूरकर आणि औरंगजेबाचे उदात्तीकरण करणारे समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांच्यावर एकत्र कारवाई करावी, अबू आझमी यांचे विधानसभा सभागृहाचे सदस्यत्व रहित करावे’, अशी मागणी त्यांनी केली.

अंबादास दानवे म्हणाले की, राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवरायांचा इतिहास विकृत पद्धतीने मांडला आहे. विकृत मानसिकता असलेल्या या गुन्हेगारावर कारवाई न करता त्याला पुणे महानगरपालिकेच्या वतीने सांस्कृतिक धोरण ठरवणार्‍या सल्लागार समितीत घेऊन सन्मान करण्यात आला आहे. हे प्रकरण लक्षात घेता शासनच राहुल सोलापूरकर आणि प्रशांत कोरटकर यांना पाठीशी घालत आहे.