|

मुंबई – राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा, तसेच ग्राहक संरक्षणमंत्री धनंजय मुंडे यांनी ४ मार्चला त्यागपत्र दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ते स्वीकारून राज्यपालांकडे पाठवले आहे. बीडच्या मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्येच्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यावर खंडणीचा गुन्हा नोंद असून ते सध्या अटकेत आहेत. यामुळे राज्यभरातून मुंडे यांच्या त्यागपत्राची मागणी केली जात होती. शेवटी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसर्या दिवशी मुंडे यांनी त्यांचे त्यागपत्र मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केले.
१. या संदर्भात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे म्हणाले, ‘‘धनंजय मुंडे यांनी त्यागपत्र दिले; मात्र राज्यात महिला-मुली यांच्यावर अत्याचार वाढत असून हे सरकारच विसर्जित झाले पाहिजे. या प्रकरणातील आरोपींना भर चौकात फाशी दिली गेली पाहिजे.’’
२. या प्रकरणात राज्यभर आंदोलन छेडणारे भाजपचे आमदार सुरेश धस म्हणाले, ‘‘देवाची काठी लागत नाही; पण न्याय नक्कीच होतो. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या संदर्भात जी छायाचित्रे प्रसिद्धीमाध्यमांमध्ये आली आहेत, ती पाहून सगळ्यांच्या डोळ्यांत पाणी आले. संतोष हा भाजपचा बूथप्रमुख होता. त्यामुळे त्याला न्याय मिळालाच पाहिजे.’’