Odisha Lord Jagannath Tattoo Controversy : परदेशी महिलेने मांडीवर काढला भगवान जगन्नाथाचा टॅटू !

महिलेच्या विरोधात गुन्हा नोंद झाल्यावर क्षमायाचना

क्षमायाचना करताना परदेशी महिला

भुवनेश्वर (ओडिशा) – येथे एका विदेशी महिलेले मांडीवर भगवान जगन्नाथाचे चित्र (टॅटू म्हणजे शरिरावर जाणीवपूर्वक केलेली खूण, आकृती, रचना किंवा शब्द) गोंदवून घेतला. याचे छायाचित्र सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाले. या प्रकरणी भुवनेश्वरमधील शहीद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परदेशी महिलेने भुवनेश्वरमधील एका टॅटू पार्लरमध्ये टॅटू गोंदवून घेतला होता. ही महिला एका सामाजिक संस्थेमध्ये काम करते.

१. महिलेविरुद्ध तक्रार प्रविष्ट (दाखल) करणारे सुब्रत मोहानी म्हणाले की, त्या महिलेने भगवान जगन्नाथाचा टॅटू अयोग्य ठिकाणी गोंदवून घेतला आहे, यामुळे आमच्या भावना दुखावल्या आहेत. हा सर्व जगन्नाथांचे भक्त आणि सर्व हिंदू यांचा अपमान आहे. यामध्ये सहभागी असलेल्यांवर कारवाई झाली पाहिजे.

२. या प्रकरणी संबंधित महिलेने एका व्हिडिओद्वारे म्हटले की, मला भगवान जगन्नाथांचा अपमान करायचा नव्हता. मी भगवान जगन्नाथांची खरी भक्त असून मी प्रतिदिन मंदिरात जाते. मी चूक केली आणि मला त्याविषयी फार वाईट वाटते. मी केवळ कलाकाराला टॅटू एका लपलेल्या जागी ठेवण्यास सांगितले. मला कोणताही प्रश्न निर्माण करायचा नव्हता. मी तो काढून टाकेन. माझ्या चुकीसाठी मला क्षमा करा.

३. टॅटू शॉपच्या मालकाने सांगितले की, ती महिला तिच्या मांडीवर भगवान जगन्नाथांचा टॅटू काढण्यासाठी आली होती. आमच्या कर्मचार्‍यांनी तिला असे न करण्याचा सल्ला दिला होता. तिला तिच्या हातावर टॅटू काढण्यास सांगण्यात आले; पण ती मान्य करायला सिद्ध नव्हती. या घटनेविषयी मी मनापासून क्षमा मागतो. टॅटू काढला तेव्हा मी दुकानात नव्हतो.

संपादकीय भूमिका

अशांना केवळ क्षमा मागून सोडून देऊ नये, तर कारागृहात टाकले पाहिजे !