पणजी, ३ मार्च, (वार्ता.) – २ मार्च या दिवशी पर्वरी येथील श्री खाप्रेश्वर देवस्थानची घुमटी आणि मूर्ती यांचे स्थलांतर करण्यावरून दिवसभर वातावरण तंग होते. स्थानिक, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि विरोधी पक्षांचे नेते यांनी मंदिर अन् वटवृक्ष हटवण्यास तीव्र विरोध केला; मात्र त्यानंतर ३ मार्चला पहाटेच्या सुमारास पोलीस बंदोबस्तामध्ये श्री खाप्रेश्वराची मूर्ती काढून गिरी येथे नेण्यात आली, तसेच श्री खाप्रेश्वर घुमटीच्या जवळ असलेला वटवृक्ष सुकूर- गिरी येथे मोठ्या जेसीबी यंत्राच्या साहाय्याने स्थलांतरित करण्यात आला.
प्रारंभी लोकांचा विरोध पाहून न्यायदंडाधिकारी देवेंद्र प्रभु, उपअधीक्षक विश्वेश कर्पे आणि निरीक्षक राहुल परब यांनी पोलीस बंदोबस्त ठेवून वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला. या वेळी सामाजिक कार्यकर्ते दीपेश नाईक, शंकर पोळजी, स्वप्नेश शेर्लेकर, अधिवक्ता शैलेश गावस, संजय बर्डे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, आम आदमी पक्षाचे अमित पालेकर आणि इतरांनी न्यायदंडाधिकारी अन् पोलीस यांच्याकडे
न्यायालयाच्या आदेशाची प्रत दाखवण्याचा आग्रह धरला असता त्यांना नकार देण्यात आल्याने लोक अधिक संतप्त झाले.
सरकारने मंदिर आणि वृटवृक्ष यांचे स्थलांतर करण्यासाठी सुकूर, गिरी येथील महामार्गाच्या शेजारी जागा निश्चित केली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्थलांतरित वटवृक्षाच्या जागीच नूतन मंदिर उभारण्याचे आश्वासन दिले आहे. पर्वरीचे आमदार आणि पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी या विरोधामागे राजकारण असल्याचा दावा केला आहे. ते म्हणाले, ‘‘श्री देव खाप्रेश्वर प्रकरणाविषयी मुख्यमंत्र्यांनी आधीच स्पष्टीकरण दिलेले आहे. २ मार्च या दिवशी जे घडले ते वर्ष २०१९ मध्ये ठरवले जाऊ शकले असते; पण आता हेतूपुरस्सर मला यात अपकीर्त करण्याचा प्रयत्न केला जात आहे.’’ काँग्रेसचे नेते सुनील कवठणकर यांनी संयुक्त मामलेदार आणि उड्डाणपुलाचे काम करणारा कंत्राटदार यांच्या विरोधात गुन्हा शाखेकडे तक्रार प्रविष्ट (दाखल) केली आहे. ‘श्री खाप्रेश्वरदेवाची विटंबना केली आणि असंख्य भाविकांच्या धार्मिक भावना दुखावल्या
आहेत’, असा दावा त्यांनी केला आहे.