दोनापावला आणि तुये येथील खात्याच्या भूमीतील अतिक्रमणे भुईसपाट

माहिती तंत्रज्ञान खात्याची कारवाई

पणजी, ३ मार्च (वार्ता.) – दोनापावला येथील माहिती तंत्रज्ञान खात्याच्या भूमीत केलेले अतिक्रमण ३ मार्च या दिवशी सकाळी जेसीबी आणून हटवण्यात आले. या ठिकाणी ‘शेड’ आणि संरक्षक भिंत अनधिकृतपणे उभारण्यात आली होती. माहिती तंत्रज्ञान खात्याने तुये येथील भूमीतीलही
अतिक्रमण हटवले आहे. या कारवाईच्या वेळी मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा नेमण्यात आला होता.

माहिती तंत्रज्ञान खात्याची दोनापावला येथे २५ चौरस मीटर भूमी आहे आणि या जागेचा बाजारभाव सध्या २५० कोटी रुपये आहे. ही भूमी माहिती तंत्रज्ञान पार्क बनवण्यासाठी राखीव ठेवण्यात आली होती; मात्र त्या ठिकाणी काहींनी विविध बांधकामे करून अतिक्रमण केले होते. या
ठिकाणी अतिक्रमण करणार्‍यांचा त्या ठिकाणी उद्यान उभारण्याचा उद्देश होता आणि यासाठी यंत्रही आणून ठेवण्यात आले होते. सरकारने अतिक्रमण हटवण्यासाठी संबंधितांना नोटिसा पाठवल्या होत्या; मात्र या नोटिसांना कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. कारवाईविषयी बोलतांना माहिती तंत्रज्ञान मंत्री रोहन खंवटे म्हणाले, ‘‘माहिती तंत्रज्ञान आणि पर्यटन खात्यांच्या भूमीत आम्ही कुठल्याही प्रकारचे अतिक्रमण खपवून घेणार नाही.’’