‘नवनिर्वाचित देहली विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आम आदमी पक्षाच्या विधानसभेतील नेत्या माजी मुख्यमंत्री आतिशी मार्लेना आणि त्या पक्षाचे अन्य आमदार यांनी प्रचंड गदारोळ करत डॉ. बाबासाहेब आंबेडकर अन् क्रांतीकारक भगतसिंग यांच्या प्रतिमा हटवल्याचा आरोप सत्ताधारी भाजपवर केला. हे सदस्य कुठल्याही प्रकारे सत्ताधारी भाजपच्या मुख्यमंत्र्यांचे निवेदन ऐकून घेण्याच्या सिद्धतेत नव्हते. प्रत्यक्षामध्ये त्या प्रतिमा हटवण्यात आल्या नसून त्यांची जागा पालटण्यात आली आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीच्या मागे राष्ट्रपती, पंतप्रधान आणि म. गांधी यांच्या प्रतिमा लावण्यात आल्या आहेत. प्रसिद्धीमाध्यमांनी याची नोंद घेत प्रतिमा सभागृहातच असल्याचे वृत्त प्रकाशित केले आहे, तरीही आपच्या आमदारांनी काहीही ऐकून न घेता दुसर्या दिवशी आंदोलन करत देहली विधानसभेबाहेर गदारोळ केला.

१. जनतेने काय धडा घ्यायचा ?
सत्ता गेली; म्हणून कुठल्याही भावनिक सूत्रांचे भांडवल करून लोकांसमोर सत्ताधारी भाजपची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न ‘आप’चे आमदार करतांना दिसत होते. त्यांना ‘आपण सभागृहात लोकप्रतिनिधी म्हणून आलो आहोत. सभागृहातील शिस्त, सभागृहामध्ये आल्यानंतर स्वतःचे वर्तन कसे असायला हवे ?’, याचा कुठलाही विचार नव्हता. जनतेसमोर ‘आम्हीच केवळ तुमच्या भावनिक गोष्टी उचलून धरत आहोत आणि तुमचा पाठिंबा आम्हालाच मिळायला हवा. भाजप सरकार जनताविरोधी आहे ?’, हे दर्शवण्यासाठी ‘आप’च्या आमदारांचा हा सगळा काथ्याकूट चालू असल्याचे दिसून येत होते. यातून मला जनेतला हा प्रश्न विचारायचा आहे, ‘हे आमदार निवडून येतात ते खरोखरच जनतेच्या हितासाठी, जनतेला सुखावह असे राज्य देण्यासाठी निवडून येतात कि केवळ जनतेच्या भावनांचा उपयोग करून त्या लाटेवर आरूढ होऊन सत्ता लाटण्यासाठी हे निवडणूक लढवतात ?’ भावनिक प्रश्नांवर पोळी भाजून सत्तेची थाळी स्वतःच्या पुढ्यात ओढून घेण्यासाठी तुम्ही त्यांना निवडून दिले आहे की, जनतेची, पयार्याने राष्ट्राची सर्वांगीण उन्नती करून घेण्यासाठी ?’, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. यावर सूज्ञ जनतेने विचार करून लोकप्रतिनिधी निवडले, तरच या देशात खरी लोकशाही नांदू शकेल !
२. जनतेने लोकप्रतिनिधी निवडतांना विचार करायला हवा !
गेली ७७ वर्षे काँग्रेसने भारतीय राजकारणाला जी सवय लावली, ‘केवळ लोकभावनांना हात घालून भावनांच्या लाटेवर स्वार होणे आणि सत्ता मिळवणे.’ तोच कित्ता अन्य पक्षही आता गिरवत आहेत. ‘निकोप राजकारण भारतीय लोकशाहीत बघायलाच मिळत नाही’, ही भारतीय व्यवस्थेची शोकांतिका आहे. येथे केवळ एकमेकांवरचा अविश्वास आणि सत्तेसाठी रस्सीखेच एवढाच भाग अन् त्यासाठी वाटेल त्या थराला जाण्याची सिद्धता दिसून येते. जनता सूज्ञ व्हावी अन् तिने या सगळ्यांचा विचार करायला हवा, ‘किती काळ आपण भावनिक मुद्यांवरून भडकवणार्या अशा लोकप्रतिनिधींना निवडून देणार ? खरेच ते आपला विकास साधू शकतात का ?’ जनतेने असे आमदार आणि खासदार यांना परत मते मागायला आल्यावर खडसावून जाब विचारायला हवा. अन्यथा असा गदारोळ करून ते जनतेने भरलेल्या कराचा पैसा असाच उधळून स्वतःचे उखळ पांढरे करून घेतील.’
– श्री. धैवत वाघमारे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२७.२.२०२५)