उद्या, ५ मार्च या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा तिथीनुसार स्मृतीदिन आहे. त्या निमित्ताने…
काँग्रेसचे खासदार राहुल गांधी लोकसभेत म्हणत होते, ‘‘हमारी तरफ शहिदोंकी रांगे लगी थी । तुम्हारे सावरकर इंग्रजोंकी माफी मांग रहे थे ।’’ पोरकटपणा, भारतीय इतिहासाचे गडद अज्ञान, लाडावलेल्या श्रीमंताच्या मुलांमध्ये दिसावा, तसा उन्मत्त बेदरकारपणा या सर्व गुणांचे मिश्रण राहुल यांच्या देहबोलीतून उमटत होते. या सगळ्यातून स्वतांत्र्यवीर सावरकर यांचे चारित्र्यहनन करण्याविषयीची मोहीमच अर्थात् षड्यंत्रच काँग्रेसवाल्यांनी उघडल्याचे दिसून येते. या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्यवीर सावरकर हे विविधांगाने कसे महान होते ? आणि काँग्रेसचेच नेहरू अन् इंदिरा गांधी यांनी त्यांच्याविषयी काढलेले गौरवोद्गार येथे देत आहोत.
१. काँग्रेसच्या इंदिरा गांधी यांनी काढलेले गौरवोद्गार
२६ फेब्रुवारी १९६६ या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे निर्वाण झाले. त्या वेळी लोकसभेत श्रद्धांजली वाहतांना काँग्रेसच्या इंदिरा गांधी म्हणाल्या होत्या, ‘देशभक्ती, शौर्य आणि स्वार्थ त्याग, साहस या गुणांचे दुसरे नाव सावरकर !’
२. सावरकर १५-१६ वर्षांचे असतांना नाशिकजवळची पांडव लेणी पाहून त्यांना लगेच सुचलेली कविता
‘‘लेणी बघाया मग पांडवाची । गेलो वयस्यासह मी ही साची ।।
अत्यंत रम्य स्थल पाहता ते । संतोष झाला बहु मन्मनाते ।।१।।
परंतु जाता क्षण हर्ष गेला । शोकानले दाह मनात केला ।
की थोर विद्वान पितरां अशाला । कुपुत्र आम्ही तरी हे कशाला ?।।
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अंतरंगातील ही बोचणी आंतरिक व्यक्तीत्वावर प्रकाश टाकते.
३. संपूर्ण स्वातंत्र्याचा उद्घोष करणारे पहिले नेते
भारतीय राजकारणात संपूर्ण स्वातंत्र्याचा उद्घोष करणारे पहिले नेते म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर ! याविषयीचा प्रलेखीय पुरावा, म्हणजे वयाच्या १९ व्या वर्षी (वर्ष १९०२ मध्ये) त्यांनी रचलेले भारतमातेचे ‘स्वतंत्रता स्तोत्र’, म्हणजेच ‘जयोऽस्तुते श्री महन्मंगले शिवास्पदे शुभदे । स्वतंत्रते भगवते त्वामहं यशोयुतां वंदे ।।’
४. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे स्वातंत्र्य युद्धाविषयीचे विचार
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या इंग्लंडमधील चळवळीतील कालखंड आणि कार्य बरेचसे अज्ञातच आहे. काही काही घटनांवरून त्यांचा काहीसा बोध होऊ शकतो. त्याच वेळी १०-१० घंटे ग्रंथालयात बसून ‘इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स’ या जागतिक प्रसिद्धीच्या पुस्तकाचे लेखन करण्याकरता त्यांनी केलेले प्रचंड संशोधन पाहून मन थक्क होते. अगदी पहिल्यांदा वर्ष १९०७ मध्ये ‘१८५७ चे बंड नसून स्वातंत्र्ययुद्ध होते’, हे सिद्ध करणारा २४ वर्षांचा लेखक तेही बॅरिस्टरचा अभ्यास करत असतांना आणि क्रांतीकार्याचे सर्व व्याप सांभाळून एवढे संशोधन करणारा अगदी विरळाच होता.
केवळ भारतात ५ ते १० इंग्रज अधिकार्यांना मारून स्वराज्य मिळेल, हे वाटण्याएवढे सावरकर अपरिपक्व नव्हतेच. या क्रांतीकारकांच्या ठिणग्या जनक्षोभाचा वणवा पेटवण्यास उपयोगी पडतात; म्हणूनच सावरकर यांची ही खटपट होती !
५. सावरकर यांच्या निवेदनाचा गर्भितार्थ
सावरकर यांनी अंदमानातून ब्रिटिशांना धाडलेल्या निवेदनाला ‘माफी’ समजणार्या पोपटपंची करणार्यांनी आधी सावरकर यांची मनोभूमिका समजून घ्यायला पाहिजे. पोरसनेही सिकंदराचे मांडलिकत्व स्वीकारून सिकंदराच्या राज्याचा क्षेत्रपाल बनला होता म्हणून आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबला ‘मी तुमचा नेक सेवक’, असे पत्र पाठवले ; म्हणून ‘शिवाजी महाराजांना स्वराज नको होते, ते एक औरंगजेबचा सेवक होते. हे पहा त्याचे माफीपत्र म्हणून हिणवू शकेल’; परंतु इतिहासात केवळ कागदी चिठ्ठीत काय लिहिले आहे ? यापेक्षा त्या व्यक्तीचे वर्तन त्या चिठ्ठीआधी आणि नंतर काय होते, हे पडताळूनच त्या चिठ्ठीचा अर्थ काढला पाहिजे. आगर्याहून परत आल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेली स्वराज्य संस्थापना आणि आर्य चाणक्य यांच्या क्रांतीला यश येऊन चंद्रगुप्तांनी ग्रीकांशी निकराचा लढा देऊन ग्रीकांना हाकलून लावण्याच्या वेळी पोरसांनी दाखवलेली देशनिष्ठा यावरूनच त्या महान विभूतींचे मूल्य कळते.
‘देशशत्रूला कसाही ठकवून भुलवून कोंडीत पकडावे आणि ठेचावे; कारण जो मला जसा भजतो, तसा मी त्याला पावतो’, हे प्रत्यक्ष श्रीकृष्णाने गीतेत सांगितले आहे. ‘अधर्माशी गाठ पडली की, सवाई अधम होऊन त्याला झोडावे’, या राजनीतीनेच छत्रपती शिवरायांनी राष्ट्ररक्षण केले. छत्रपती शिवरायांची राजनीतीच सावरकर आणि क्रांतीकारक यांची गीता होती; म्हणूनच गांधीजींचा सत्याग्रह अन् इंग्रजांविषयीचा दृष्टीकोन आणि सावरकर यांचा दृष्टीकोन हा वेगळा होता. सावरकर यांनी ब्रिटिशांना लिहिलेल्या पत्रांचा अर्थ काढतांना सावरकर यांच्या दृष्टीकोनाचाच विचार करायला पाहिजे. सावरकर यांच्या पत्रांचा विचार करतांना इंग्रजांनीसुद्धा सावरकर यांच्या विचारांचा आणि व्यक्तीत्वाचा विचार बाजूला ठेवला नाही; म्हणूनच त्यांच्या बिल्ल्यावरील ‘D’ (डी), म्हणजे ‘डेंजरस’ हा शब्द त्यांनी कधी काढला नाही. आजही अंदमानात तो बिल्ला आहे.
५ अ. ‘सावरकर सुटकेचा अर्ज’ हा राजकारणाचा एक भाग आणि म. गांधी यांनी केलेले त्याचे समर्थन : स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी इंग्रज सरकारला स्वतःच्या सुटकेसाठी ३ अर्ज पाठवले. त्यामागची भूमिका पहिल्या महायुद्धाच्या काळात डावपेच आखून परकीय साहाय्य घेऊन आणि इंग्रजांवर सशस्त्र आक्रमण करून भारतभूमीचे स्वातंत्र्य मिळवायचे, याकरता कसेतरी करून कारागृहातून बाहेर पडणे, हे होते. एवढ्या कार्यकर्तृत्वाचा नेता कारागृहात अडकून सडावा, हे देशातील खर्या मुत्सद्यांना कधीच मान्य नव्हते. त्या वेळी संसदेमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ आणि संस्थापक नेते सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी प्रश्न विचारून सावरकर यांच्या सुटकेसाठी खटपट केली होती. या लोक चळवळीला साहाय्य म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अर्ज आवश्यकच होता. पहिल्या महायुद्धात टिळक पक्ष आणि क्रांतीकारक पक्ष यांनी जर्मनीशी संधान बांधून इंग्रजांविरुद्ध जी मोर्चेबांधणी केली, ती एवढी फलद्रूप झाली की, त्या वेळी वाटाघाटीत जर्मनकडून ज्या अटी इंग्लंडला घातल्या गेल्या हाेत्या, त्यात जर्मनच्या केसरकडून हिंदुस्थानला स्वातंत्र्य देण्याची अट घातली गेली होती. ‘इंग्लंडस् डिफिकल्टी इज अवर अपॉर्च्युनिटी’ (इंग्लंडच्या पुढे संकट हीच आम्हाला सुवर्णसंधी वाटते), हे लोकमान्य टिळक यांचे प्रसिद्ध वाक्य आणि धोरण हे त्याच संधीचे होते. या राष्ट्रीय संधीच्या वेळी सावरकरांसारखा मोहरा अडकून पडावा, हे कुणाही देशभक्ताला आणि त्या वेळेच्या पुढार्याला पटणारे नव्हतेच. वैयक्तिक छळ, सुख, सुटका यांच्यापलीकडे स्वातंत्र्यवीर सावरकर केव्हाच गेले होते. अर्थात् हा इतिहास राहुल गांधी आणि त्यांचे तळवे चाटणारे अनुयायी यांना समजण्याचे कारण नाही. ‘चौकीदार चोर है’ (पहारेकरी चोर आहे), हे वाक्यच सर्वाेच्च न्यायालयाने मान्य केले’, असे म्हणताच सर्वाेच्च न्यायालयाने थोडे दरडावताच सपशेल क्षमायाचना मागणार्या राहुल गांधी यांना सावरकर यांची उंची आणि त्याग याची किंमत कशी समजणार ? ‘स्वतः म. गांधींनी वर्ष १९२१ मध्ये सावरकर यांनी सुटकेकरता अर्ज करावा. मी व्हाईसरॉयजवळ खटपट करतो’, असे म्हणून आश्वसन दिले होते. ‘सावरकर सुटकेचा अर्ज करत होते’, असे बरळणार्यांनी त्या वेळेच्या राजकारणाचा तो भाग होता आणि स्वतः म. गांधींनी त्याचे समर्थन केले होते, हेही समजून घेतले पाहिजे.
६. म. गांधी आणि सावरकर यांच्या सत्याग्रहाच्या भूमिकेतील भेद
म. गांधी आणि सावरकर यांच्या सत्याग्रहाच्या भूमिकेत मूलतः भेद होता. ‘सत्याग्रहीने चूपचाप इंग्रजांचे सर्व कारागृहातील नियम पाळून प्रसंगी प्राणत्याग करावा; पण इंग्रज सरकारचे नियम मोडू नये’, हा गांधीजींचा आदेश, तर ‘स्वतःची न्यूनतम हानी करून शत्रूपक्षाला अधिकाधिक हानी कशी पोचवता येईल’, हे सावरकर यांचे धोरण ! या धोरणावर प्रकाश टाकणारा प्रसंग म्हणून पुढील प्रसंगाचे वर्णन करता येईल. हैद्राबादच्या निझामाच्या दडपशाहीविरुद्ध वर्ष १९४० मध्ये हिंदु महासभेने जो अभूतपूर्व लढा उभारला आणि जवळजवळ १० सहस्रांहून अधिक स्वयंसेवक सत्याग्रह करून हैद्राबादला कैदेत बंद होते. त्या वेळी या सत्याग्रहाला अभूतपूर्व प्रसिद्धी मिळाली. म. गांधी आणि काँग्रेसचा एकाधिकार असणारा सत्याग्रह हिंदु महासभेने यशस्वी करण्याचा प्रयत्न केला; म्हणून हिंदु महासभेचे ज्येष्ठ पुढारी डॉ. मुंजे यांना वर्ध्याला भेटीला बोलावले. त्याप्रसंगी त्या उभयतांत झालेली प्रश्नोत्तरे अशी –
म. गांधी : हे पहा ! डॉ. मुंजे सत्याग्रह हे दुधारी हत्यार आहे. त्याचा प्रणेता मी आहे ! ते समजून घेऊनच वापरले पाहिजे !
डॉ. मुंजे : हे पहा महात्माजी ! आपला गैरसमज होत आहे. आमचा हा सत्याग्रह नसून हा आहे निःशस्त्र प्रतिकार ! याचा प्रणेता कुणी लुंग्या तुंग्या नसून प्रभु रामचंद्र आणि भगवान श्रीकृष्णापासून हा मार्ग चालू आहे. देशभक्तीच्या गोष्टी आपण काय आम्हाला सांगाव्या ? ‘देव मस्तकी धरावा । अवघा हलकल्लोळ करावा ।।’, ही शिकवण तर आमच्या रक्तातच आहे. आपला सत्याग्रह वेगळा ! आमचा निःशस्त्र प्रतिकार वेगळा !!
– श्री. श्रीश हळदे (साभार : त्रैमासिक ‘प्रज्ञालोक’) (क्रमशः)