Left N Liberals Danger To Hindus : मुसलमान अथवा ख्रिस्ती नव्हे, तर साम्यवादी लोक हिंदूंसाठी सर्वांत मोठा धोका ! – आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा

  • आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांचा दावा

  • राहुल गांधी आणि ममता बॅनर्जी यांना ‘हिंदूंचे अस्तित्व संपेल’, असे वाटत असल्याचेही वक्तव्य !

आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा

कोलकाता (बंगाल) – साम्यवादी आणि उदारमतवादी लोक हे हिंदूंसाठी सर्वांत मोठा धोका आहेत. मुसलमान किंवा ख्रिस्ती कधीही हिंदूंसाठी धोका ठरलेले नव्हते. हिंदूंना कमकुवत करणारे हिंदूंमध्येच आहेत. बंगालमध्ये हिंदूंना कमकुवत करणे, हा साम्यवादी आणि उदारमतवादी लोकांकडून ममता बॅनर्जी यांना मिळालेला वारसा आहे, असे वक्तव्य आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी केला. ते २ मार्चला येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते.

मुख्यमंत्री सरमा पुढे म्हणाले की,

१. भारताची संस्कृती ५ सहस्र वर्षांहून अधिक प्राचीन आहे. ती वर्ष १९४७ मध्ये देशाच्या स्वातंत्र्यापासून चालू झालेली नाही, हे आपण लक्षात घेतले पाहिजे.

२. भारत हे नैसर्गिकरित्या धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. कुणीही त्याला सहिष्णुता आणि बंधूत्व शिकवण्याची आवश्यकता नाही.

३. जर राहुल गांधी किंवा ममता बॅनर्जी यांना वाटत असेल की, ‘हिंदूंचे अस्तित्व संपेल’, तर त्यांनी हे लक्षात घ्यावे की, हिंदूंचे अस्तित्व नेहमीच होते आणि राहील.

४. आसाममध्ये हिंदूंची लोकसंख्या ५८ टक्क्यांपर्यंत अल्प झाली आहे, तर बंगालमध्ये हिंदु समुदायाची टक्केवारी अनुमाने ६५ टक्के असेल.

५. देशात समान नागरी कायदा येण्याची चिन्हे दिसत आहेत. पंतप्रधान मोदी सत्तेत आल्यानंतर भारताचे पुनरुत्थान चालू झाले आहे. देश अर्थव्यवस्थेपासून विज्ञानापर्यंत सर्व क्षेत्रात प्रगती करत आहे.