पर्वरी येथे उड्डाणपुलाच्या कामासाठी २०० वर्षांपूर्वीचे वडाचे झाड स्थलांतर करण्याच्या कामाला प्रारंभ

श्री देव खाप्रेश्वर मंदिराच्या स्थलांतरास स्थानिकांचा तीव्र विरोध

पणजी, २ मार्च (वार्ता.) – मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने पर्वरी येथील उड्डाणपुलाच्या कामाला अडथळा ठरत असलेले सुमारे २०० वर्षांपूर्वीचे वडाचे झाड स्थलांतर करण्यास गेल्या आठवड्यात अनुमती दिली होती. यानंतर शासनाने २ फेब्रुवारी या दिवशी सकाळी वडाचे झाड स्थलांतर करण्यास प्रारंभ केला; मात्र वडाच्या झाडासमवेत वडाच्या झाडाखाली असलल्या श्री देव खाप्रेश्वर मंदिराचा भाग तोडण्याच्या कामास प्रारंभ झाल्यानंतर स्थानिकांमध्ये तीव्र संताप उसळला. स्थानिकांनी या वेळी कंत्राटदार आणि पोलीस यांच्याशी हुज्जत घालण्यास प्रारंभ केला. या वेळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. २ फेब्रुवारी या दिवशी सकाळी ६ वाजल्यापासून कंत्राटदाराच्या उपस्थितीत वडाच्या झाडाच्या छाटणीला प्रारंभ झाला. वडाच्या झाडाच्या फांद्या यंत्राद्वारे तोडल्या जात असतांना अनेक भाविकांना अश्रू
अनावर झाले.

गावचा राखणदार श्री देव खाप्रेश्वर मंदिर हटवण्याची घाई का ? – भाविकांचा प्रश्न

‘श्री देव खाप्रेश्वर देवता ही स्थानदेवता आहे’, असे सांगून स्थानिकांनी वडाच्या झाडाच्या स्थलांतराला आक्षेप घेणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठात प्रविष्ट (दाखल) केली होती. या सुनावणीच्या वेळी सरकारने वडाच्या स्थलांतरासाठी तज्ञांच्या शिफारसी आणि उपाययोजना न्यायालयात सुपुर्द केल्या होत्या.

मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने सरकारचे म्हणणे मान्य करून १९ फेब्रुवारी या दिवशी वडाच्या झाडाची याचिका निकालात काढतांना उड्डाणपुलाच्या कामासाठी या झाडाचे स्थलांतर करण्यास संमती दर्शवली होती. तज्ञांनी दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचे निर्देश न्यायालयाने या वेळी दिले होते. सुनावणीच्या वेळी राज्याचे महाधिवक्ता देवीदास पांगम म्हणाले, ‘‘न्यायालयात केवळ देवस्थानच्या वडाचा प्रश्न होता. मंदिर हा एक वेगळा विषय आहे आणि त्याच्या स्थलांतराविषयी कोणताही निर्णय झालेला नाही. ते मंदिर तेथे ठेवायचे कि ते अन्यत्र हालवायचे याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभाग घेणार आहे.’’

२ फेब्रुवारी या दिवशी सकाळी कंत्राटदाराने देवस्थानच्या भागालाही हात घातल्यामुळे तणाव निर्माण झाला. देवस्थान समितीने या प्रकाराला विरोध केला. श्री देव खाप्रेश्वर गावचा राखणदार म्हणून ग्रामस्थांची श्रद्धा आहे. ‘शासन आणि पोलीस यांनी मंदिराचे स्थलांतर करण्याचा आदेश दाखवावा’, अशी मागणी स्थानिकांनी पोलीस अन् शासकीय अधिकारी यांच्याकडे केली. श्री देव खाप्रेश्वराच्या आशीर्वादाने पर्वरी येथील विकासकामे होत आली आहेत. वड आणि देवाची मूर्ती तेथून हालवली जात असल्याने लोकभावनांना तीव्र ठेच पोचल्याचे या वेळी दिसून आले. पोलीस अधिकार्‍यांनी ‘आम्ही उच्च न्यायालयाच्या निर्देशाचे पालन करत आहोत’, असे उत्तर दिले. या वेळी मोठ्या संख्येने सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक जमले होते. या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या वेळी घटनास्थळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, आम आदमी पक्षाचे नेते अमित पालेकर आदींनी मंदिराजवळ येऊन चालू असलेल्या कारवाईविषयी पोलीस आणि प्रशासन यांना विविध प्रश्न केले. या वेळी सरकारवर टिकेची झोड उठवण्यात आली. प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी ‘मंदिर हटवण्याचा कायदेशीर आदेश आहे का ?’, ‘मंदिरातील श्री खाप्रेश्वरदेवाची मूर्ती कोठे स्थलांतरित करणार आहे ?’, असे प्रश्न केले. घटनास्थळी हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या अनुपस्थितीविषयीही अमित पाटकर यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.