नागरिकांनी दक्ष राहून अपप्रवृत्तींना थारा न देण्याचे पोलिसांचे आवाहन

  • मालवण येथे शांतता समितीची बैठक

  • शांतता बिघडवणार्‍यांच्या विरोधात कारवाई करण्याची नागरिकांची मागणी

मालवण – आगामी काळात होळी, धूलिवंदन, गुढीपाडवा, रमजान ईद यांसारखे सण साजरे होणार आहेत. या सणांच्या पार्श्वभूमीवर समाजात शांतता आणि सौहार्दपूर्ण वातावरण कायम ठेवणे, हे सर्वांचे दायित्व आहे. नागरिकांनी दक्ष राहून अपप्रवृत्तींना थारा देऊ नये, असे आवाहन पोलीस उपअधीक्षक घनःश्याम आढाव यांनी केले. ‘शांतता बिघडवणार्‍या मुसलमान भंगारवाल्यामुळे अनेक अनधिकृत गोष्टी समोर आल्या आहेत. पोलीस आणि प्रशासन यांनीही अशा प्रवृत्तींच्या विरोधात कायद्याचा बडगा उगारावा’, अशी सूचना या वेळी नागरिकांकडून करण्यात आली.

मालवण पोलीस ठाण्यात उपविभागीय पोलीस अधिकारी घनःश्याम आढाव यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस निरीक्षक कोल्हे यांच्या उपस्थितीत शांतता समितीची बैठक पार पडली. या वेळी अधिवक्ता समीर गवाणकर, हसरत खान, जॉन नर्‍होना, भाऊ सामंत, संदीप बोडवे, जाबीर खान, ललित चव्हाण, बाबी जोगी, श्रीराज बांदेकर, मुस्ताक अथणीकर, नदीम मुजावर, समीर गोवेकर, सलाम मुजावर, सलीम खान, तेजस चव्हाण, रफीक शेख आदी उपस्थित होते.

वायरी येथील भंगार व्यावसायिक परप्रांतीय मुसलमानाने भारताच्या विरोधात घोषणा देण्याची घटना नुकतीच घडली होती. याचा संदर्भ देत ‘शांतता बिघडवणार्‍या आणि अनेक कृत्यांत सहभाग असलेल्या या भंगारवाल्यांच्या भावासह त्यांच्या कुटुंबियांना येथे कोणत्याही स्वरूपात थारा देऊ नये’, अशी मागणी सर्वानुमते या वेळी करण्यात आली.

तालुक्यातील गोळवण गावात परप्रांतीय मुसलमानाच्या नावावर हिंदूचे घर करण्याची घटना घडली होती. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी अधिवक्ता गवाणकर यांनी केली. बनावट आधारकार्ड बनवून आणि नाव पालटून व्यवसाय करणार्‍यांचा शोध घेऊन कारवाई केली पाहिजे, अशी मागणी या वेळी करण्यात आली.

शहरात आणि गावागावांत फिरणार्‍या भंगारवाल्यांकडे संशयाने पाहिले जाते. त्यात काही प्रामाणिकपणे व्यवसाय करणार्‍या भंगारवाल्यांची खात्री करून प्रशासनाने त्यांना स्वतंत्र ओळखपत्र वितरीत करावे, अशी सूचना हसरत खान यांनी केली.

मालवणमध्ये सर्व जाती पंथांचे नागरिक सलोख्याने वागत आले आहेत. एकमेकांच्या सण-उत्सवात सामील होत आले आहेत, असे सांगण्यात आले.

‘आम्ही कुणालाही येथे येऊन व्यवसाय करू नका’, असे म्हणणार नाही; परंतु कोणत्याही गुन्हेगारी प्रवृत्तीला पाठीशी घालणार नाही. समाजात तेढ निर्माण करणार्‍या व्यक्तीबाबत आम्हाला कळवा. कुणीही कायदा-सुव्यवस्था बिघडेल असे कृत्य करू नये. दोन किंवा त्या पेक्षा अधिक गुन्हे दाखल असतील, तर पोलीस अशा व्यक्तीच्या विरोधात तडीपारीची कारवाई करू शकतात, असे पोलीस उप विभागीय अधिकारी आढावा म्हणाले.