सतत उत्साही आणि प्रेमभाव असणारे देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमातील श्री. राजेश वागदेव (वय ५८ वर्षे) !

‘श्री. राजेश वागदेव (वय ५८ वर्षे) देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात पूर्णवेळ साधना करतात. ते काही कालावधीसाठी रामनाथी (गोवा) येथील आश्रमात आले होते. त्या वेळी मी श्री. राजेश वागदेवकाका यांच्यासमवेत त्यांच्या खोलीत रहात असतांना मला त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे पुढे दिली आहेत. 

श्री. राजेश वागदेव

१. सतत हसतमुख असणे

श्री. वागदेवकाका सतत हसतमुख असतात. ते बोलतांना अन्य साधकांनाही आनंद देतात, तसेच कोणाशीही बोलतांना ‘हे आपलेच आहेत’, या भावाने त्यांच्याशी बोलतात.

२. इतरांचा विचार करणे

काका सतत इतरांचा विचार करतात. एकदा आश्रमात नवीन आलेल्या एका साधिकेकडे घड्याळ आणि भ्रमणभाष नव्हता. त्यामुळे तिला सेवेला येण्यास विलंब होत असे. ही गोष्ट काकांच्या लक्षात आल्यावर त्यांनी लगेच स्वतःजवळील घड्याळ तिला दिले.

श्री. प्रशांत हरिहर

३. सेवेत सवलत न घेणे

काकांचे वय ५८ वर्षे आहे. तरी ते सतत उत्साही असतात. त्यांना हातदुखीचा त्रास असतांनाही ते कधीही सेवेत सवलत घेत नाहीत.

काकांनी त्यांच्यापेक्षा वयाने लहान असलेल्या एका साधकाला स्वतःतील स्वभावदोष विचारून घेऊन त्यानुसार स्वयंसूचना बनवून घेतल्या. त्याने सांगितलेले स्वभावदोष त्यांनी सहजपणे स्वीकारले. अशा प्रकारे ते वयाने लहान असलेल्यांकडूनही सतत शिकत असतात.

४. स्वावलंबी

खोलीतील स्वच्छतेचे साहित्य (साबण, साबणचुरा इत्यादी) संपले असल्यास ते कोणावर अवलंबून न रहाता स्वतःहून आणतात. यातून त्यांचा प्रेमभावही दिसून येतो. ते रुग्णाईत असतांना इतरांना जेवण वगैरे आणून देण्यास न सांगता ते स्वतः भोजनगृहात जायचे.

५. भगवान शिवाविषयी अपार श्रद्धा असणे

श्री. वागदेवकाका यांचा भगवान शिवाप्रती पुष्कळ भाव आहे. ते खोलीत असतांना त्यांच्याकडून खोलीतील श्रीकृष्ण आणि शिवपिंडी यांच्या पूजेत एकदाही खंड पडला नाही. सकाळी लवकर उठून फुले आणणे, भावपूर्ण पूजा करणे, नामजप आणि सेवा करणे असे करत त्यांनी स्वतःला सक्रीय ठेवले होते.’

– श्री. प्रशांत हरिहर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२.१२.२०२४)