सोलापूर येथील श्री. मिनेश पुजारे यांना उमगलेला साधनेच्या विविध अवस्थांचा अर्थ !

सोलापूर येथील श्री. मिनेश पुजारे वर्ष २०२४ च्या ऑगस्ट ते ऑक्टोबर या दोन मासांच्या कालावधीत रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेच्या आश्रमात ‘स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया’ शिकण्यासाठी आले होते. व्यष्टी साधनेचे प्रयत्न करतांना देवाने त्यांना सुचवलेले साधनेतील शब्दांचे अर्थ येथे दिले आहेत. 

श्री. मिनेश पुजारे

१. मोक्ष

मोहाचा क्षय होणे, म्हणजे मोक्ष ! माझ्या जीवनातील प्रत्येक क्षणावर श्री गुरूंचा अधिकार आहे. स्वतःचा विचार करून तो क्षणही वाया घालवण्याचा मला काहीच अधिकार नाही.

२. अंतर्मुखता

सातत्याने मनाची दिशा अंतरात आणि आत्मचिंतनात ठेवणे.

३. अनुसंधान

सातत्याने सूक्ष्मरूपाने देवाचे केलेले स्मरण. मीदेखील माझ्या गुरूंचा अंश आहे. माझ्यातील गुरूंचे सूक्ष्म अस्तित्व क्षणोक्षणी अनुभवणे, हेच ‘अनुसंधान !’

४. एकरूपता

माझ्यामध्ये मी स्वतःचे आणि गुरूंचे अस्तित्व किती टक्के अनुभवतो? सातत्याने १०० टक्के गुरूंचे अस्तित्व अनुभवणे, म्हणजेच गुरुतत्वाशी १०० टक्के एकरूपता होय.

५. लीनता

मी काय समवेत घेऊन फिरत असतो ? ‘स्व’कर्तृत्व’ कि ‘गुरु बोले देह बोले, गुरु सांगे देह कृती करे ।’ याची जाणीव आणि अनुभूती ?

६. मनाचे समर्पण

मनरूपी भांड्यात कसले विचार आहेत ? स्व, माझी प्रगती, भूत-भविष्याचे विचार कि गुरुसेवा ? ‘गुरूंचे आज्ञापालन, गुरुतत्व, गुरुकार्य, गुरूंचा विचार आणि गुरूंच्या शिकवणीशी संपूर्णपणे एकरूपता हेच मनाचे समर्पण !’

साधनेतील विविध पैलूंची ओळख करून देऊन श्री गुरु पुढे पुढे घेऊन जात आहेत. याबद्दल गुरुचरणी कोटीशः कृतज्ञता !’

– श्री. मिनेश पुजारे,  सोलापूर. (२९.१०.२०२४)