महापुरुषांविषयी केलेल्या वक्तव्यांचा परिणाम
पुणे – पुणे शहराचे सांस्कृतिक धोरण ठरवणार्या समितीमध्ये तज्ञ सल्लागार म्हणून राहुल सोलापूरकर यांचे नाव आल्याने विरोधकांनी महापालिकेवर टीका केली. ‘सद्यस्थितीत कोणतीही समिती नेमण्यात आलेली नाही, याची नोंद घ्यावी’, असे महापालिकेने परिपत्रक काढून स्पष्टीकरण दिले आहे. अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी काही दिवसांपूर्वी वादग्रस्त वक्तव्ये केली होती. त्यावर समाजातून टीका झाल्यानंतर त्यांनी जाहीरपणे क्षमाही मागितली होती.
गेल्या ३ वर्षांपासून पुणे शहराचे सांस्कृतिक धोरण ठरवण्याचे काम चालू आहे. हे धोरण ठरवणार्या सल्लागार समितीमध्ये अभिनेते राहुल सोलापूरकर यांचे नाव आधीपासूनच आहे; परंतु आता त्यांचे नाव समोर येत आहे; पण त्यांच्या नावाला विरोध होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जितेंद्र आव्हाड यांनीही आक्षेप घेतला आहे.
डिसेंबर २०२३ मध्ये सांस्कृतिक धोेरण निश्चित करण्यासाठी समिती नेमली होती. आता या समितीने सांस्कृतिक धोरण सादर केले असले, तरी त्यावर सर्वांशी चर्चा करूनच अंतिम मसुदा सिद्ध करण्यात येणार आहे. समितीने दिलेल्या धोरणास मान्यता दिलेली नाही, असेही स्पष्टीकरण महापालिकेने दिले आहे.