जळगाव येथील सेवाकेंद्रात दिवाळीनिमित्त केलेला भावजागृतीचा प्रयोग !

‘भावजागृती’ हा साधकाचा साधनेच्या वाटचालीतील मोठा आधारस्तंभ आहे. साधकाच्या भावामुळे त्याला भगवंत विविध अनुभूती देतो, त्याचे विविध संकटप्रसंगी रक्षण करतो. असे म्हटले आहे, ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार भगवंत पदोपदी साधकाच्या समवेत रहातो, त्यामुळे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांमध्ये भावजागृती होण्यासाठी भावजागृतीचे प्रयोग करणे, भावसत्संग, तसेच राष्ट्रीय स्तरावरील भक्तीसत्संग इत्यादींच्या माध्यमातून प्रयत्न करण्यास सांगितले. नंदुरबार (महाराष्ट्र) येथील सनातनच्या साधिका सौ. निवेदिता जोशी (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ५२ वर्षे) यांनी भावजागृतीसाठी विविध प्रयोग केले. ते येथे दिले आहेत.

‘जगद्गुरु भगवान श्रीकृष्ण, परमदयाळू गुरुमाऊली, सद्गुरु काका (सनातन संस्थेचे सद्गुरु नंदकुमार जाधव [वय ७२ वर्षे]), यांच्या चरणी संपूर्णपणे शरण जाऊन भावजागृतीसाठी प्रयोग करूया !

१. आश्रमदेवतेला प्रार्थना

सौ. निवेदिता योगेंद्र जोशी

आज आपण जळगाव येथील सेवाकेंद्रामध्ये आलो आहोत. जळगाव सेवाकेंद्र, म्हणजे रामनाथी आश्रमाचे प्रतिरूपच झाले आहे. आपण सर्व साधक भावपूर्णपणे आश्रमदेवतेला नमस्कार करून प्रार्थना करूया. हे आश्रमदेवते ! तूच रामनाथी आश्रम आहेस. इथे प्रत्यक्ष परात्पर गुरुदेवांप्रमाणेच सर्वांवर प्रीती करणारे सद्गुरु काका आहेत. त्यांच्यासारखा निरपेक्ष प्रीतीचा गुण आमच्यातही येऊ दे ! अशी आपण प्रार्थना करूया. आश्रम देवतेने आपणा सर्वांना भरभरून आशीर्वाद दिला आहे.

२. साधकांनी साजरी केलेली भावदिवाळी !

दिवाळीच्या निमित्ताने आपण आश्रमाची सजावट करत आहोत. आश्रमासाठी लागणारे तोरण काही साधिका बनवत आहेत. हे सर्व चालू असतांना मनामध्ये श्री विष्णुस्मरण अखंड चालू आहे. आश्रमाच्या महाद्वारावर लावलेली ही फुले-पाने, म्हणजे आपणच आहोत. गुरुदेवांच्या आश्रमाच्या महाद्वाराची शोभा आपल्याला वाढवायची आहे आणि ही संधी मिळाली; म्हणून सर्व साधक अन् फुलेही कृतज्ञताभावात आहेत. काही साधिका गुरुतत्त्वाची रांगोळी काढत आहेत. रांगोळीतून क्षात्रतेज, ब्राह्मतेज आणि प्रीती यांची स्पंदने प्रक्षेपित होत आहेत. साधक एकमेकांना ‘काय हवे-नको ?’, ते अत्यंत प्रेमाने विचारत आहेत. सगळ्यांची सिद्धता झाली आहे. सद्गुरु काकांनी एक पणती प्रज्वलित केली आहे. ती गुरुदेवांच्या छायाचित्रासमोर ठेवली आहे. त्यावरून त्यांनी दुसरी पणती प्रज्वलित केली आणि सद्गुरु काकांच्या हातात असलेल्या पणतीवरून सर्व साधकांनी एक एक पणती प्रज्वलित केली आहे. आता सर्व आश्रम पणत्यांच्या प्रकाशात झळाळून निघाला आहे. त्या प्रकाशात भिंतीवर सगळीकडेच आपल्याला गुरुदेवांचे विष्णुरूप, रामरूप आणि नारायणरूप दिसत आहे. त्यांचे आपण भावपूर्ण दर्शन घेत आहोत. त्याच वेळी सद्गुरु काकांचे, ‘तुमही राम हो, तुमही कृष्ण हो, श्री जयंत में तुम समाये हो…।’, हे भावस्पर्शी स्वर कानावर येऊन साधकांचा भाव जागृत झाला आहे.

३. कृतज्ञता

‘आम्हाला हे भावक्षण अनुभवायला दिले आणि सद्गुरुकाकांचे सान्निध्य लाभले’, यासाठी गुरुदेवांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता व्यक्त करूया !’

– सौ. निवेदिता जोशी (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ५२ वर्षे), नंदुरबार, जिल्हा नंदुरबार.