धर्मांतरित झालेले पर्यटक त्यांच्या देशात आतंकवादी कारवाया करण्याची शक्यता
काबुल (अफगाणिस्तान) – अलीकडेच अफगाणिस्तानला भेट देणार्या विविध देशांतील नागरिकांनी इस्लाम स्वीकारल्याचे सूत्र पुढे आले आहे. जगातील प्रमुख गुप्तचर संस्थांनी त्यावर गांभीर्याने विचार करायला चालू केले आहे. या संस्थांना संशय आहे की, हे एखाद्या मोठ्या कटाचा भाग असू शकते.
१. गुप्तचर संस्थांच्या मते, अफगाणिस्तानला भेट देणारे अनेक पर्यटक तेथे इस्लाम स्वीकारत आहेत. यांमध्ये आयर्लंड आणि जपान यांसारख्या देशांचे नागरिक देखील समाविष्ट आहेत.
२. अलीकडेच अफगाणिस्तानातील घोर प्रांतातील शाहरुख जिल्ह्यातील दरे तख्त गावात तालिबान प्रशासनाच्या अंतर्गत स्थानिक वृद्धांच्या उपस्थितीत आयर्लंडमधील एका तरुण ख्रिस्ती पर्यटकाने इस्लाम धर्म स्वीकारला. त्याचे नाव अब्दुल्ला ठेवण्यात आले. त्याचप्रमाणे काबुलमध्ये एका जपानी पर्यटकानेही इस्लाम धर्म स्वीकारला आणि स्थानिकांनी त्याच्यासाठी मेजवानी आयोजित केली.
चीनची चाल काय आहे ?
गुप्तचर संस्थांच्या एका वरिष्ठ अधिकार्याने सांगितले की, चीन त्याच्या नागरिकांना इस्लाम धर्म स्वीकारण्यास आणि अफगाणिस्तानचे नागरिकत्व मिळवून देण्यामागे एक धोरण राबवत आहे; पण इतर देशांचे लोक असे का करत आहेत, हे स्पष्ट झालेले नाही. असे म्हटले जाते की, अफगाणिस्तानात येणार्या प्रत्येक पर्यटकाला अधिकारी आणि स्थानिक लोक इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी आमंत्रित करतात.
गुप्तचर संस्थांकडून धर्मांतरितांवर ठेवले जाणार लक्ष
धर्मांतराच्या नावाखाली काही मोठे कट रचले जात असल्याचा संशय गुप्तचर संस्थांना आहे. कारण ज्या नागरिकांनी इस्लाम स्वीकारला आहे, ते जेव्हा त्यांच्या देशात परततात, तेव्हा त्यांचा वापर तेथील आतंकवादी कारवायांमध्ये केला जाऊ शकतो. म्हणूनच इस्लाम स्वीकारणार्या या सर्व नागरिकांवर त्यांच्या देशाच्या गुप्तचर संस्थांकडून पाळत ठेवली जाईल. त्यांच्या देशांची सुरक्षा संस्था त्यांची चौकशी करेल की, त्यांनी कोणत्या परिस्थितीत इस्लाम स्वीकारला.