विश्वस्तांची नेमणूक, निलंबन आणि पदमुक्तता यासंबंधीचे नियम

कोणत्याही धर्मादाय न्यासांतर्गत विश्वस्तांची नेमणूक, निलंबन आणि पदमुक्तता ही केली जाते. यासंबंधीचे नियम ‘धर्मादाय कायद्याच्या कलम ४७’मध्ये देण्यात आले आहेत, ते येथे दिले आहेत.

श्री. दिलीप देशमुख

१. नेमणूक 

अ. ‘काही न्यासांच्या घटनेमध्ये/नियमावलीमध्ये विश्वस्त नेमणुकांचे अधिकार सह/उप/साहाय्यक धर्मादाय आयुक्त यांना दिलेले असतात. काही न्यासांच्या घटनेत विश्वस्त नेमणुकांचे अधिकार पदमुक्त होणार असलेल्या/कार्यकाळ संपत आलेल्या विश्वस्तांना, तर काही न्यासांच्या घटनेप्रमाणे निवडणुकीद्वारे विश्वस्तांची नेमणूक / नियुक्ती होत असते; परंतु पदमुक्त होणार असलेल्या / कार्यकाळ संपणार असलेल्या विश्वस्तांनी नवीन विश्वस्त नेमणुकीची कार्यवाही करणे अपेक्षित असते; परंतु काही न्यासांमध्ये ही कार्यवाही अंतर्गत वादामुळे, जाणीवपूर्वक किंवा अन्य काही कारणांमुळे केली जात नाही. अशा वेळी न्यासाशी संबंधित कोणतीही व्यक्ती कलम ४७ प्रमाणे अर्ज प्रविष्ट (दाखल) करून धर्मादाय आयुक्तांना अशी विनंती करू शकते की, ‘त्या न्यासासाठी नवीन विश्वस्तांची नेमणूक करावी’; कारण त्या न्यासासाठी विश्वस्त नाहीत किंवा त्या न्यासाच्या नियमावलीप्रमाणे ठराविक विश्वस्त संख्या असल्यविना न्यासाचे कामकाज चालवता येत नाही.

आ. कलम ४७(१) प्रमाणे अर्ज प्राप्त झाल्यानंतर त्या अर्जाच्या संदर्भात कुणाची हरकत / आक्षेप असेल, तर त्या व्यक्तीला त्याचे म्हणणे मांडण्याची संधी मिळावी, या हेतूने धर्मादाय आयुक्त ‘जाहिर प्रकटन’ काढण्याचा आणि वर्तमानपत्रात प्रकाशित करण्याचा आदेश करू शकतात. त्याचप्रमाणे इच्छुक व्यक्तींकडून विश्वस्तपदासाठी अर्जही मागवू शकतात.

इ. अर्जदार, आक्षेप (असेल तर), संबंधित व्यक्ती, विश्वस्त पदासाठी इच्छुक उमेदवार यांचे म्हणणे ऐकल्यानंतर आणि त्या न्यासाच्या घटनेतील प्रावधाने (तरतुदी) विचारात घेतल्यानंतर धर्मादाय आयुक्त योग्य ती चौकशी करू शकतात आणि इच्छुक उमेदवारांपैकी योग्य उमेदवारांची विश्वस्त म्हणून नेमणूक करू शकतात.

ई. इच्छुक उमेदवारांपैकी एखाद्या किंवा अधिक व्यक्तींची विश्वस्त या पदावर नियुक्ती करण्याच्या वेळी धर्मादाय आयुक्तांनी पुढील गोष्टी विचारात घेणे अपेक्षित आहे.

ई १. ज्या व्यक्तीने न्यासाची स्थापना केलेली आहे त्याची इच्छा : उदाहरणार्थ न्यासाची स्थापना करण्याच्या वेळी एखादा दस्त (कागदपत्र) सिद्ध केलेला असेल आणि त्यामध्ये न्यासाची स्थापना करणार्‍या व्यक्तीने असे नमूद केलेले असेल की, एखाद्या ठराविक कुटुंबातील सदस्य, एखाद्या ठराविक धर्माचा, पंथाचा अनुयायी यांचाच विश्वस्त म्हणून विचार व्हावा, तर त्या इच्छेचा आदर करणे अपेक्षित आहे.

ई २. एखाद्या व्यक्तीला विश्वस्तांची नेमणूक करण्याचे अधिकार दिलेले असतील, तर त्या व्यक्तीची इच्छा : उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीने न्यासासाठी त्याची भूमी, मिळकत दिलेली असेल किंवा न्यासाच्या स्थापनेपासून तिच्या भरभराटीसाठी प्रयत्न केलेले असतील आणि न्यासाच्या घटनेप्रमाणे किंवा न्यास स्थापनेच्या वेळी केलेल्या दस्तामध्ये असे नमूद केलेले असेल की, त्या व्यक्तीला विश्वस्त नेमणुकीचे अधिकार असतील. अशा वेळी त्या व्यक्तीचे मत जाणून घेणे, हे धर्मादाय आयुक्तांकडून अपेक्षित आहे.

ई ३. एखाद्या व्यक्तीच्या नेमणुकीमुळे न्यासाच्या कामकाजात प्रगती होऊ शकते किंवा अडथळा येऊ शकतो : उदाहरणार्थ एखाद्या उच्च पदस्थ राजकीय किंवा अन्य क्षेत्रातील व्यक्तीने विश्वस्त पदासाठी अर्ज दिलेला असेल, तर त्या व्यक्तीच्या पदाचा न्यासाला लाभ होऊ शकतो; परंतु त्या व्यक्तीच्या व्यस्ततेमुळे ती व्यक्ती न्यासास वेळ देऊ शकेल का ?, त्यामुळे निर्णय प्रक्रियेत विलंब / अडथळा येईल का ?, याचा विचार धर्मादाय आयुक्तांनी करणे आवश्यक आहे.

ई ४. न्यासामध्ये हितसंबंध असणार्‍या जनतेचा / सभासदांचा / समुहाचा कल : उदाहरणार्थ एखाद्या उच्च पदस्थ राजकीय व्यक्तीची विश्वस्तपदी नेमणूक झाल्यास ती व्यक्ती न्यासाच्या निर्णय प्रक्रियेत अन्य सभासदांना विचारात घेणार नाही, अशी भीती अन्य सदस्यांना वाटत असेल, तर याचाही विचार धर्मादाय आयुक्तांनी करावा.

ई ५. न्यासाची परंपरा आणि चालीरिती : उदाहरणार्थ एखादा धार्मिक उद्देश असलेला किंवा मंदिराशी संबंधित न्यास असेल आणि त्या न्यासाच्या काही धार्मिक परंपरा अन् चालीरिती असतील, तसेच होणार्‍या विश्वस्तास त्या परंपरा कालबाह्य, जुनाट वाटत असतील किंवा तो विश्वस्त धार्मिक नसेल किंवा धर्मास मानणारा नसेल, तर त्याच्याकडून त्या परंपरा, चालीरिती पाळल्या जाणार नाहीत, अशी शक्यता वाटत असेल, तर धर्मादाय आयुक्तांनी त्याचा विचार करावा.

उ. विश्वस्त नेमणुकीची प्रक्रिया पारदर्शकपणे आणि वरील गोष्टी विचारात घेऊन पार पाडली, तर भविष्यात त्या न्यासासंदर्भात कोणतीही अडचण येणार नाही.

ऊ. विश्वस्त नेमणुकीची प्रक्रिया पूर्ण करतांना किंवा त्यानंतर धर्मादाय आयुक्त असा आदेश पारित करू शकतात की, न्यासाची मिळकत नवनियुक्त विश्वस्तांच्या कह्यात देण्यात यावी किंवा ती मिळकत नवनियुक्त विश्वस्तांच्या कह्यात राहील.

ए. धर्मादाय आयुक्त यांनी कलम ४७ (२) प्रमाणे पारित केलेल्या विश्वस्त नेमणुकीच्या आदेशामुळे व्यथित झालेली व्यक्ती त्या आदेशाच्या दिनांकापासून ६० दिवसांच्या आत त्या आदेशाविरुद्ध उच्च न्यायालयात दाद मागू शकते.

२. विश्वस्तांचे निलंबन, पदमुक्ती किंवा नाव वगळणे

अ. विश्वस्तांचे निलंबन आणि बडतर्फी यांची कार्यवाही ‘कलम ४१ ड’प्रमाणे करता येते. ‘कलम ४१ ड’प्रमाणे ज्या कारणांमुळे विश्वस्ताचे निलंबन आणि बडतर्फी केली जाते, त्या व्यतिरिक्त खालील कारणांवरूनही निलंबन, बडतर्फी किंवा नाव वगळणे, ही कार्यवाही ‘कलम ४७’प्रमाणे केली जाते. ती कारणे आणि प्रक्रिया खाली नमूद केलेली आहेत :

अ १. एखाद्या विश्वस्ताचा मृत्यू झाला किंवा त्याने तो विश्वस्त असल्याचे नाकारले,

अ २. धर्मादाय आयुक्त, उप / साहाय्यक धर्मादाय आयुक्त किंवा शासनाने प्राधिकृत केलेला अधिकारी यांच्या पूर्वानुमतीविना एखादा विश्वस्त ६ मासांपेक्षा अधिक कालावधीसाठी भारताबाहेर गेला,

अ ३. एखाद्या विश्वस्ताने परदेशात रहाण्याच्या हेतूने भारत देश सोडला,

अ ४. एखाद्या विश्वस्तास दिवाळखोर घोषित केले,

अ ५. ‘न्यासामधून मुक्त करावे’, अशी एखाद्या विश्वस्ताची इच्छा असेल,

अ ६. एखाद्या विश्वस्ताने विश्वस्त म्हणून काम करण्यास नकार दिला,

अ ७. न्यासामध्ये काम करण्यास अपात्र झाला किंवा शारीरिक दौर्बल्यामुळे काम करण्यास असक्षम आहे किंवा ज्या न्यासात विश्वस्त आहे, त्याच न्यासात विश्वस्त पदाला विसंगत असलेले पद स्वीकारले.

अ ८. विश्वस्त म्हणून काम करण्यास उपलब्ध नसेल,

अ ९. या अधिनियमातील कोणत्याही कलमांतर्गत किंवा नैतिक अधःपतनाच्या गुन्ह्यात शिक्षा झाली.

आ. न्यासाशी संबंधित कोणतीही व्यक्ती वरील कारणावरून विश्वस्तांचे नाव वगळावे, त्यांचे निलंबन करावे किंवा त्याला काढावे, अशी विनंती असणारा अर्ज धर्मादाय आयुक्तांकडे प्रविष्ट करू शकतो.

इ. ‘एखाद्या विश्वस्ताचा मृत्यू झालेला आहे, त्यामुळे त्याचे नाव वगळावे’, असा अर्ज प्राप्त झाल्यानंतर त्या अर्जासमवेत जोडलेले मृत्यू प्रमाणपत्र पाहून त्या संदर्भात शहानिशा केल्यानंतर धर्मादाय आयुक्त त्या विश्वस्ताचे नाव वगळण्याचा आदेश पारित करू शकतात.

ई. इतर कारणावरून अर्ज प्राप्त झाल्यानंतर संबंधित विश्वस्ताला त्याचे म्हणणे मांडण्याची संधी मिळावी, या हेतूने ‘त्या विश्वस्ताला नोटीस पाठवावी’, असा आदेश धर्मादाय आयुक्त पारित करतात.

उ. अर्जदार, संबंधित व्यक्ती आणि आणखी कुणी हितसंबंधी व्यक्तीने अर्ज सादर केला, तर त्या सर्वांचे म्हणणे ऐकून, अर्जातील कारण आणि त्यावरील संबंधित विश्वस्ताचे उत्तर विचारात घेऊन अन् योग्य ती चौकशी केल्यानंतर त्या विश्वस्तास पदमुक्त करण्याचा आदेश धर्मादाय आयुक्त पारित करू शकतात किंवा अर्ज नामंजूर करण्याचा आदेश करू शकतात.

ऊ. विश्वस्तास काढणे, पदमुक्त करणे या आदेशाने व्यथित झालेली कोणतीही व्यक्ती त्या आदेशाविरुद्ध त्या आदेशाच्या दिनांकापासून ६० दिवसांच्या आत उच्च न्यायालयात दाद मागू शकते.’

– श्री. दिलीप मा. देशमुख, निवृत्त सहधर्मादाय आयुक्त, पुणे. (२२.२.२०२५)