१. सेवेचा कोणताही पूर्वानुभव नसतांनाही ‘गुरुदेवांनी सेवा सांगितली, म्हणजे ती होणारच आहे आणि तेच ती करून घेणार आहेत’, असा दृढ विचार सेवा करतांना मनात असणे
‘पूर्वी संस्थेतील संगणकीय लिखाण एका ‘फाँट’मध्ये (अक्षरशैलीत) होते; मात्र काही वर्षांनी काही कारणास्तव त्या ‘फाँट’मध्ये पालट करावा लागला. काही कारणास्तव आपल्याला अत्यल्प वेळेत एका अन्य ‘फाँट’मध्ये लिखाण करणे बंधनकारक होते. ‘फाँट’ पालटाचा हा परिणाम संस्थेकडे असलेल्या सर्व लिखाणांवर होणार होता. त्यामुळे हा एक मोठा प्रकल्पच होता. गुरुदेवांनी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) मला ही सेवा करायला सांगितली. मी अशा प्रकल्पाचा प्रथमच अभ्यास करत होतो. तेव्हा सेवा करतांना माझ्या मनात ‘गुरुदेवांनी ही सेवा सांगितली आहे, तर ती होणारच आहे आणि गुरुदेवच ती करून घेणार आहेत’, असा दृढ विश्वास होता.
२. दोन आस्थापनांचे ‘फाँट’ संस्थेच्या निकषानुसार असणे आणि ‘गुरुदेव सांगतील त्या आस्थापनाचा ‘फाँट’ अंतिम करूया’, असा विचार असणे
ही सेवा करण्यासाठी माझ्या समवेत तांत्रिक विषयाचा अभ्यास असणारे श्री. नीलेश पाध्ये आणि अन्य साधकही होते. आम्ही काही आस्थापनांच्या संगणकीय अक्षरांचा (फाँटचा) अभ्यास केल्यानंतर संस्थेच्या निकषानुसार २ आस्थापनांचे ‘फाँट’ उपलब्ध होते. आम्ही त्या दोन्ही आस्थापनांना संपर्क केल्यानंतर त्यांनी आम्हाला वेगवेगळी ‘पॅकेजेस’(सुविधा) दिली. प्रत्येक वेळी एका आस्थापनाने एखादी ‘ऑफर’ (प्रस्ताव) दिल्यानंतर दुसरे आस्थापन आम्हाला आणखी काही ‘ऑफर’ द्यायचे. या प्रकल्पाचा परिणाम सर्वत्र होणार होता. त्यामुळे आम्हाला ही सेवा अत्यंत काळजीपूर्वक आणि वेळेच्या बंधनामुळे गतीनेही करावी लागत होती. तेव्हा माझ्या मनात ‘या दोन्ही आस्थापनांपैकी कोणत्या आस्थापनाचे ‘पॅकेज’ अंतिम करायचे’, हे गुरुदेवांनी सांगितले की, त्यानुसार पुढील कार्यवाही करता येईल’, असा विचार होता.

३. गुरुदेवांनी साधकांना दोन्ही आस्थापनांच्या कार्यालयांना भेट देऊन माहिती करून घेण्यास सांगणे
आमचे या दोन्ही आस्थापनांच्या अधिकार्यांशी प्राथमिक टप्प्याचे बोलणे चालू होते. त्या कालावधीत मला मुंबई आणि पुणे येथे वैयक्तिक कामानिमित्त जावे लागत होते. तेव्हा गुरुदेवांनी मला सांगितले, ‘‘तू तेथे जाणार आहेस, तर त्या आस्थापनांच्या कार्यालयातही जाऊन ये.’’ मी अन्य साधकांच्या समवेत त्यांच्या कार्यालयात गेल्यानंतर आम्हाला तेथील वरिष्ठ अधिकार्यांशी चर्चा करता आली आणि त्यांच्या अन्य चालू असलेल्या प्रकल्पांचा अभ्यास करता आला. याचाही आम्हाला अभ्यासासाठी आणि निर्णयप्रक्रियेसाठी लाभ झाला. तेव्हा गुरुदेवांनी सांगितलेल्या गोष्टीमागील कार्यकारणभाव माझ्या लक्षात आला.
४. साधकांना अनेक प्रश्न विचारून सेवेतील बारकावे लक्षात आणून देणारे आणि त्यानुसार सेवेचा सखोल अभ्यास करण्यासाठी दिशा देणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !
आम्ही दोन्ही आस्थापनांविषयीचा अभ्यास घेऊन गुरुदेवांकडे गेल्यावर त्यांनी आम्हाला अनेक प्रश्न विचारले. गुरुदेवांनी आम्हाला ‘त्या दोन ‘फाँट’मध्ये किती भाषांत लिखाण करू शकतो, प्रत्येक ‘फाँट’मधील चांगल्या गोष्टी, त्यांचा लाभ, हानी, किती कालावधीपर्यंत ‘सर्व्हिस’ देणार, दोन्ही ‘फाँट’विषयी अन्य तज्ञांची मते’ आदी १५ ते २० सूत्रे सांगून एक सारणी बनवायला सांगितली. गुरुदेव आम्हाला ‘मला अशा तांत्रिक विषयात फारसे ठाऊक नाही’, असे सांगत असले, तरीही त्यांनी आम्हाला या विषयातील पुष्कळ बारकावे लक्षात आणून दिले आणि अभ्यासासाठी दिशाही दिली. त्यांनी सांगितलेली बरीचशी सूत्रे आम्हाला सुचलीही नव्हती. त्यांनी सांगितल्यानुसार श्री. नीलेश पाध्ये यांनी चांगल्या प्रकारे सारणी बनवली.
५. गुरुदेवांनी साधकांना निर्णयप्रक्रियेतील स्थूल आणि सूक्ष्म या दोन्ही भागांचे महत्त्व लक्षात आणून देणे
मला त्या विषयाचा अभ्यास करतांना प्रत्येक वेळी काहीतरी अपूर्ण असल्याचे जाणवायचे; मात्र परात्पर गुरुदेवांनी सांगितल्यानुसार केलेल्या सारणीचा अभ्यास झाल्यानंतर मला समाधान वाटले. आम्ही केलेल्या अभ्यासाविषयी गुरुदेवांना सांगितल्यानंतर त्यांनी ‘अभ्यासाअंती आलेल्या उत्तराकडे पाहून आतून उत्तर काय येते’, असा प्रयोगही आमच्याकडून करून घेतला. त्यानंतर त्यांनी आम्हाला उत्तरदायी साधकांचे मत विचारायला सांगितले. सर्वांनुमते ‘एका आस्थापनाचा फाँट अंतिम करूया’, असे उत्तर येत होते. त्यानंतर गुरुदेवांनी निर्णय सांगितला.
६. साधकांना टप्प्याटप्प्याने शिकवणे
खरेतर गुरुदेव ‘कोणता ‘फाँट’ वापरायचा ?’, याविषयी एका क्षणात सांगू शकले असते; मात्र त्यांनी आम्हाला विविध प्रश्न विचारून आमच्याकडून सखोल अभ्यास करून घेतला. ‘बुद्धी वापरून सखोल अभ्यास करत गेल्यानंतर आपण खर्या उत्तरापर्यंत पोचतो’, हे त्यांनी सांगितले. ‘निर्णयप्रक्रियेत स्थूल आणि सूक्ष्म हे दोन्ही भाग किती महत्त्वाचे आहेत !’, हेही त्यांनी या वेळी दाखवून दिले. गुरुदेवांनी ‘कोणत्याही मोठ्या प्रकल्पाचा आरंभ ते अंतिम निर्णयप्रक्रिया कशी करायला हवी ?’, याविषयी आम्हाला शिकवले.
७. गुरुदेवांनी कार्यात्मक फलनिष्पत्ती वाढवण्यासह साधकांमध्ये शिकण्याची वृत्ती आणि साधनेची अधिकाधिक गोडी निर्माण करणे
या सर्व प्रकल्पात गुरुदेवांनी प्रत्येक टप्प्याला आम्हाला आमच्या चुका दाखवल्या, तसेच आम्हाला पुष्कळ प्रोत्साहनही दिले. साधकांना एखाद्या सूत्राबद्दल चांगले सुचल्यास किंवा प्रकल्पातील एखादा टप्पा पूर्ण झाल्यानंतर गुरुदेवांनी आमचे वेळोवेळी कौतुकही केले. नंतर त्यांनी सर्वांना प्रसादही दिला. त्यांनी ‘साधकांना एखाद्या गोष्टीचे दायित्व घेण्यास शिकवणे, त्यांतील नवीन सूत्रांचा अभ्यास करायला शिकवणे, वेळोवेळी झालेल्या चुका दाखवणे, सेवा करतांना पुष्कळ प्रोत्साहन देणे, सेवेतील साधकांच्या अडचणी सोडवणे, निर्णयप्रक्रिया शिकवणे, कौतुक करणे आणि सेवा झाल्यानंतर प्रसाद देणे’, या क्रमाने ही सर्व प्रक्रिया करून घेतली. गुरुदेवांनी आमची कार्यात्मक फलनिष्पत्ती वाढवण्यासह आमच्यामध्ये साधनेची अधिकाधिक गोडी निर्माण केली आिण ‘आमच्यात शिकण्याची वृत्ती कशी निर्माण होईल’, याकडेही लक्ष दिले.
८. कृतज्ञता आणि प्रार्थना
‘देवाला या जगात अशक्य असे काहीच नाही’, हे आपण नेहमीच ऐकतो. ‘एका अनभिज्ञ क्षेत्राविषयी मला काही ठाऊक नसतांना त्याविषयी शिकणे आणि साधकांकडून अत्यंत सहजतेने अन् आनंदाने सेवा करून घेणे’, ही एक अनोखी गोष्ट मला अनुभवायला मिळाली. खरेतर ‘गुरुदेवांच्या अस्तित्वानेच सर्व होते’, याची त्यांनी मला प्रचीती दिली. हे सर्व शिकवल्याबद्दल मी गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.
‘गुरुदेवा, तुम्ही आम्हाला अखंड शिकवत असता. मला तुम्हाला अपेक्षित असे शिकता येऊ दे आणि ते माझ्या आचरणात आणता येऊ दे’, अशी माझी आपल्या चरणी कळकळीची प्रार्थना आहे.’
– श्री. रोहित साळुंके, फोंडा, गोवा.
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. |