मातृभाषेतील शिक्षणामुळे शब्दसंग्रहासह ज्ञानसंपदेत वाढ ! – शाहीर पाटील, साहित्यिक

सांगली येथे ‘मराठी भाषा गौरव दिन’ साजरा !

‘मराठी भाषा गौरव दिन’ उत्साहात साजरा करतांना जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयातील मान्यवर

सांगली, १ मार्च (वार्ता.) – मराठी भाषेला अडीच सहस्र वर्षांचा इतिहास लाभला आहे. महानुभाव पंथाचे चक्रधर स्वामी, म्हाइंभट यांच्यापासून ते संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर, जगद्गुरु संत तुकाराम यांचे आध्यात्मिक साहित्य आणि ग्रंथरचना त्याची साक्ष देतात. शब्द आणि ज्ञान संपदा वाढवण्यासाठी मातृभाषेचा सक्षम वापर करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन निवृत्त मुख्याध्यापक आणि साहित्यिक शाहीर पाटील यांनी येथे केले. जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात २७ फेब्रुवारी या दिवशी ‘मराठी भाषा गौरव दिन’ कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमास कार्यालयातील कर्मचारी, ग्रंथपाल, साहित्यिक, वाचक आणि स्पर्धा परीक्षांचे अभ्यास करणारे विद्यार्थी उपस्थित होते.

वि.वा. शिरवाडकर उपाख्य कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले असून आपल्या मातृभाषेचा गौरव म्हणून कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस म्हणजेच हा ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय आणि जिल्हा मराठी भाषा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हा कार्यक्रम जिल्हा ग्रंथालय अधिकारी अमित सोनवणे, जिल्हा मराठी अध्यापक संघाचे अध्यक्ष विठ्ठल मोहिते, कवी प्रकाश वायदंडे, ज्येष्ठ पत्रकार चिंतामणी सहस्रबुद्धे या प्रमुख वक्त्यांसह ग्रंथपाल, वाचक आणि साहित्यिक यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.

प्रास्ताविकात जिल्हा ग्रंथालय अधिकारी अमित सोनवणे म्हणाले, ‘‘केंद्र शासनाने नुकताच मराठी भाषेला अभिजात दर्जा दिलेला आहे. यामुळे मराठी भाषा आणि साहित्य यांचा प्रचार-प्रसार अन् संवर्धन करण्याच्या कार्याला मोठी गती प्राप्त होईल. तरुणांमध्ये मराठी भाषेविषयी जिज्ञासा, कुतूहल, आकर्षण आणि अभिमान वाढीस लागण्यासाठी नजीकच्या काळात मोठ्या प्रमाणात विकीपीडियापासून ते ‘एआय’ (कृत्रिम बुद्धीमत्ता) पर्यंत मराठी साहित्य उपलब्ध करून त्याविषयी जागरूकता वाढवावी लागेल.’’