चिपळूण नगरपरिषदेने  २ दिवसांत १७५ अतिक्रमणे हटवली !

शहरात अतिक्रमण केल्यास गुन्हा नोंद होणार


चिपळूण – चिपळूण नगरपरिषदेने शहरात अतिक्रमणांच्या विरोधात मोहीम हाती घेतली आहे. २ दिवस केलेल्या या कारवाईत एकूण १७५ अतिक्रमणे हटवण्यात आली. अतिक्रमणे दूर करण्यात आल्याने बहुतांशी शहर मोकळे झाले आहे. ही कारवाई करतांना अतिक्रमण करणार्‍यांचे साहित्य कह्यात घेण्यात आले. शहर अतिक्रमणमुक्त रहाण्यासाठी आता प्रतिदिन एक पथक लक्ष ठेवणार आहे. ‘या कारवाईनंतरही कुणी अतिक्रमण केल्यास त्यांच्या विरोधात गुन्हे नोंद केले जाणार आहेत’, अशी चेतावणी नगरपरिषद प्रशासनाने दिली आहे.


गेल्या काही वर्षांपासून शहरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढले होते. यामुळे वाहतूक कोंडीसह अनेक समस्या निर्माण होत होत्या. त्यामुळे मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी २७ आणि २८ फेब्रुवारी या दिवशी अतिक्रमणांवर बुलडोझर फिरवला. पहिल्या दिवशी मध्यवर्ती बसस्थानक ते चिंचनाका परिसरातील ७५ अतिक्रमणे तोडण्यात आली. यामुळे अर्धे शहर मोकळे झाले. दुसर्‍या दिवशी चिंचनाका ते बाजारपेठ, बाजारपूल, मार्कडी आदी भागांत ही कारवाई करण्यात आली. अतिक्रमण करणार्‍या व्यावसायिकांचे  साहित्य कह्यात घेऊन ते कचरा डेपोत टाकण्यात आले. बाजारपेठेत कारवाई करतांना व्यावसायिकांची तारांबळ उडाली होती. काहींनी राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न केला; मात्र प्रशासनाने त्यास बळी न पडता कुणालाही साहित्य परत  दिले नाही.

मुख्याधिकारी विशाल भोसले, अतिक्रमणमुक्त विभागाचे प्रमुख संदेश टोपरे आदींसह ७० कर्मचारी,  २ जेसीबी, ४ डंपर (अवजड सामान वाहून नेणारे वाहन) आणि पोलिसांचे पथक या मोहीमेत सहभागी झाले होते.