यावल आणि चोपडा तालुक्यातील गडदुर्गांचेही संवर्धन व्हावे ! – हिंदु जनजागृती समिती

पारोळा गड अतिक्रमणमुक्त करण्याच्या निर्णयासाठी शासनाचे अभिनंदन !

जळगाव येथील पारोळा गड

जळगाव – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जळगाव जिल्ह्यातील ऐतिहासिक वारसा असलेला पारोळा गड अतिक्रमणमुक्त करून त्याचे सुशोभिकरण करण्यात यावे, यासाठी मागील काही मासांपासून प्रयत्न करण्यात येत होते. याच अनुषंगाने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन देण्यात आले होते, तसेच त्यांच्या समवेत महत्त्वपूर्ण बैठकही घेण्यात आली होती. या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत जळगाव जिल्हाधिकार्‍यांनी पारोळा गडाच्या अतिक्रमण मुक्तीसाठी विशेष समिती नेमण्याचा निर्णय घेतला आहे. गडाचे संरक्षण आणि सुशोभिकरण यांसाठी ठोस कार्य आराखडा सिद्ध करण्यात आला आहे. हिंदु जनजागृती समिती या ऐतिहासिक पावलाचे मनःपूर्वक स्वागत करते आणि जिल्हाधिकार्‍यांचे अभिनंदन करते. जळगाव जिल्ह्यातील यावल आणि चोपडा तालुक्यातील ऐतिहासिक गडदुर्गांवरील अतिक्रमण दूर करून त्यांचेही संरक्षण आणि सुशोभिकरण करण्यात यावे, अशी समितीची मागणी आहे.