टिळक महाराष्ट्र विद्यापिठाच्या वतीने ‘पितांबरी प्रॉडक्ट्स’चे रवींद्र प्रभुदेसाई यांना ‘डी.लिट्.’ पदवी !

८ मार्चला होणार पदवी प्रदान समारंभ

ज्येष्ठ उद्योजक रवींद्र प्रभुदेसाई

पुणे – टिळक महाराष्ट्र विद्यापिठाच्या वतीने ‘पितांबरी प्रॉडक्ट्स’चे व्यवस्थापकीय संचालक तथा ज्येष्ठ उद्योजक रवींद्र प्रभुदेसाई, उद्योजिका सुलज्जा फिरोदिया मोटवानी आणि ज्येष्ठ अभिनेते तथा मनोविकारतज्ञ डॉ. मोहन आगाशे यांना ‘डी.लिट्.’ (विद्यानिधी) देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. ८ मार्च या दिवशी ‘टिळक महाराष्ट्र विद्यापिठा’चा ४८ वा पदवी प्रदान समारंभ संस्थेच्या मुकुंदनगर येथील संकुलामध्ये होणार आहे. या दिवशी निवड केलेल्या मान्यवरांना ‘डी. लिट्.’ पदवी प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती विद्यापिठाचे कुलपती डॉ. दीपक टिळक आणि कुलगुरु डॉ. गीताली टिळक यांनी दिली.

१. प्रसिद्ध उद्योजक रवींद्र प्रभुदेसाई हे ‘पितांबरी प्रॉडक्ट्स’चे व्यवस्थापकीय संचालक आहेत. त्यांनी उद्योग समुहाच्या विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. पितांबरीची ३ राज्यांमध्ये उत्पादन केंद्रे असून अमेरिका, कॅनडा, ब्राझील, रशिया आणि ऑस्ट्रेलियासह २६ देशांमध्ये पितांबरीच्या उत्पादनांची विक्री होते.

२. सुलज्जा फिरोदिया मोटवानी या ‘कायनेटिक ग्रीन एनर्जी अँड पॉवर सोल्युशन’च्या संस्थापिका आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. त्यांनी ‘कायनेटिक ग्रीन’ आस्थापनाच्या माध्यमातून इलेक्ट्रिक वाहन निर्मिती क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. कायनेटिक उद्योग समुहाच्या सर्व व्यावसायिक धोरणांचे दायित्व त्यांनी समर्थपणे सांभाळले आहे.

३. ज्येष्ठ अभिनेते आणि मनोविकारतज्ञ डॉ. मोहन आगाशे यांनी मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. डॉ. आगाशे यांनी विविध नाटके, हिंदी-मराठी चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. वर्ष १९६६ मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार, तसेच वर्ष १९९० मध्ये भारत सरकारकडून ‘पद्मश्री’ या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.