IAF Chief On Fighter Jets Requirement : भारतीय हवाई दलाला प्रतिवर्षी ४० लढाऊ विमानांची आवश्यकता ! – वायूदलप्रमुख

हवाईदलप्रमुख एअर चीफ मार्शल ए.पी. सिंह

नवी देहली – भारतीय हवाई दलाला प्रतिवर्षी ३० ते ४० लढाऊ विमानांची आवश्यकता आहे. याची पूर्तता झाल्यासच कालबाह्य झालेल्या ‘मिराज’, ‘मिग-२९’ आणि ‘जॅगवार’ यांसारखी जुनी विमाने सेवेतून बाद करता येतील, अशी स्पष्टोक्ती हवाईदलप्रमुख एअर चीफ मार्शल ए.पी. सिंह यांनी केली.

हवाईदलप्रमुख सिंह पुढे म्हणाले की ,

१. हवाई दलाचे प्राधान्य स्वदेशी बनावटीच्या लढाऊ विमानांना असून हे लक्ष्य साध्य करण्यासाठी खासगी क्षेत्रातील भागीदारी वाढवली पाहिजे.

२. हवाई दलाकडे सध्या ३१ ‘स्क्वॅड्रन’ (१२ समान लढाऊ विमानांचा एक गट) आहेत; परंतु दलाला ४२ ‘स्क्वॅड्रन’ची आवश्यकता आहे. यामुळेच देशाला प्रतिवर्षी किमान ३० ते ४० लढाऊ विमानांची निर्मिती करावी लागेल. हे लक्ष्य साध्य करणे अशक्यही नाही.

३. ‘हिंदुस्थान ॲरेनॉटिक्स लिमिटेड’ आस्थापनाची प्रतिवर्षी ३० लढाऊ विमाने बनवण्याची क्षमता आहे. यासह खासगी क्षेत्रातील आस्थापनांशी भागीदारी केल्यास आपण आणखी १२ ते १८ लढाऊ विमाने बनवू शकू.