आजच्या थोडक्यात महत्त्वाच्या बातम्या (२७.२.२०२५) 

कर्नाटकसाठी बससेवा चालू !

मुंबई – राज्य परिवहन महामंडळाची महाराष्ट्र-कर्नाटक बससेवा पोलीस बंदोबस्तात चालू झाली आहे. ५ दिवसांपूर्वी कर्नाटकातील चित्रदुर्ग येथे राज्य परिवहन  महामंडळाच्या वाहकाला कानडी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी काळे फासले. त्यानंतर त्याचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात उमटले होते. कर्नाटकात जाणार्‍या बस अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आल्या होत्या.


अनैतिक संबंधात ६ वर्षांनंतर अत्याचाराची तक्रार

कल्याण – एका विधवा महिलेचे तिच्याच व्यवसायात भागीदार असलेला नारायण गुप्ता याच्याशी ६ वर्षे अनैतिक संबंध होते. आता तो तिच्याशी लग्न करत नसल्याने स्वतःवर लैंगिक अत्याचार करत असल्याची तक्रार तिने पोलिसांकडे केली. गुप्ता याला पोलिसांनी अटक केली आहे. लग्नाचा आग्रह केल्याने गुप्ता याने तिला मारहाण करून लैंगिक अत्याचार केल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे.


राज्यात उष्णतेची लाट

मुंबई – २५ फेब्रुवारी या दिवशी मुंबईत ३८.४ अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदवले गेले. गेले काही दिवस ३७ अंश सेल्सिअस इतके तापमान मुंबईत आहे. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी कोकण किनारपट्टीवर वरील प्रकारे तापमानात वाढ झाली आहे.  मैदानी भागात ४०, किनारपट्टीवर ३७ आणि डोंगराळ भागात ३० अंश सेल्सिअस तापमान असल्यास ‘उष्णतेची लाट’, असे संबोधले जाते.


१ एप्रिल २०१९ पूर्वीच्या वाहनांना जी.एस्.टी.

मुंबई – १ एप्रिल २०१९ पूर्वीच्या वाहनांना १८ टक्के जी.एस्.टी. कर भरावा लागणार आहे. या वाहनांना एच्.एस्.आर्.पी. म्हणजे ‘हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट’ लावणे बंधनकारक आहे. ही पाटी लावण्याचा अंतिम दिनांक ३० एप्रिल हा आहे.


भिवंडीत ८ वर्षांच्या मुलाचा मृतदेह

भिवंडी (ठाणे ) – येथून बेपत्ता झालेल्या एका ८ वर्षांच्या मुलाचा मृतदेह घराजवळील तलावाजवळ आढळून आला. मुलाच्या डोक्यावर जखमेच्या खुणा असून तोंडातून फेस येत असल्याचा दावा मुलाच्या कुटुंबियांनी केला आहे. मुलाने खाऊ घेण्यासाठी आजोबांकडून पैसे घेतले आणि तो घरातून बाहेर पडला; पण तो घरी परतलाच नाही. या प्रकरणी अज्ञात व्यक्तींविरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. कदाचित शवविच्छेदनानंतर धागेदोरे मिळू शकतात.


महिलेचा मधमाशांच्या आक्रमणात मृत्यू !

अकोला – पवार यांचे कुटुंब काजळेश्वर शेतात हरभरा काढण्यासाठी गेले होते. हरभरा काढण्याआधी पूजेसाठी धूप पेटवला. शेजारीच असलेल्या झाडावर पोळे असल्याची माहिती या कुटुंबाला नव्हती. धुपाने मधमाशांचे पोळे उठले आणि उपस्थितांवर आक्रमण केले. त्यात रेश्मा पवार या गंभीर घायाळ झाल्या. उपचारांच्या वेळी त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अन्य घायाळ झाले.