शुद्ध पिण्याच्या पाण्याचा प्रकल्प (प्लांट) प्रत्यक्षात न उभारताच पैसे घेतले !

खेड – कडधे या खेड तालुक्यातील गावात शासनाच्या जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत शुद्ध पिण्याच्या पाण्याचा प्रकल्प संमत झाला होता; मात्र हा प्रकल्प प्रत्यक्षात केलेला नसतांना त्यासाठी असणारे २ लाख ६९ सहस्र ३८१ रुपये ७ एप्रिल २०२२ या दिवशी ठेकेदाराला दिले आहेत. ग्रामपंचायतीच्या पदाधिकार्‍यांनी ही रक्कम परस्पर घेतल्याचा आरोप विकास सोसायटीचे संचालक रामदास नाईकडे, तसेच ग्रामपंचायत सदस्य रोहिणी मिरजे आणि ग्रामस्थ यांनी केला आहे. (प्रकल्प उभा न करता त्याचे पैसे घेण्याची भ्रष्टाचार्‍यांची मजल पोचणे, हे प्रशासनाला लज्जास्पद ! – संपादक) माजी उपसरपंच केतन चव्हाण यांनी ‘प्रकल्प बसवला होता; मात्र उंदरांनी नासधूस केल्याने तो काही दिवस बंद होता. आता तो दुरुस्तीसाठी दिला आहे’, असे सांगितले. या प्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कार्यवाही करावी, अशी ग्रामस्थांनी मागणी केली आहे.