सत्कारामुळे नवे दायित्व आले असून त्यात आम्ही कुठेही अल्प पडणार नाही ! – सत्कारमूर्तींचे मनोगत

रत्नागिरी – जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या मंगलहस्ते झालेल्या सत्कारामुळे आम्हा नेत्यांना एक ऊर्जा मिळालेली आहे. या सत्कारामुळे नवे दायित्व आमच्यावर आले आहे. त्यात आम्ही कुठेही अल्प पडणार नाही. जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज अध्यात्माचे कार्य जगासमोर पोचवत आहेत, याचा आम्हाला अभिमान आहे, असे कृतज्ञतापूर्वक मनोगत जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या हस्ते सत्कार झालेल्या लोकप्रतिनिधींनी येथे व्यक्त केले. या वेळी सत्कारमूर्तींनी हिंदु धर्माचा उद्घोष केला.
संतशिरोमणी गजानन महाराज यांच्या प्रकटदिनाच्या निमित्ताने आयोजित वारी उत्सवात जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या हस्ते कोकणासाठी विशेष योगदान दिलेल्या लोकप्रतिनिधींचा जाहीर सत्कार करण्यात आला. या वेळी सर्व नेत्यांनी ही भूमिका मांडली. सत्कारमूर्तींमध्ये उद्योगमंत्री उदय सामंत, बंदरे विकासमंत्री नितेश राणे, गृहराज्यमंत्री योगेश कदम, आमदार भास्कर जाधव, आमदार किरण सामंत, आमदार शेखर निकम आणि सौ. निकम, तसेच दैनिक ‘रत्नागिरी टाईम्स्’चे मालक उल्हासराव घोसाळकर यांचा समावेश होता. या वेळी संतपीठावर प.पू. कानिफनाथ महाराज यांची वंदनीय उपस्थिती होती.
सत्कारानंतर लोकप्रतिनिधींनी व्यक्त केलेले मनोगत !
मंत्री शेखर निकम म्हणाले, ‘‘गेली ३५ वर्षे मी स्वामीजींच्या बरोबर आहे. संस्थानचे मोठे ऋण आम्हा निकम कुटुंबावर आहे. त्याविषयी मी कृतज्ञ आहे. स्वामीजींचे कार्य पुढे नेण्याचा मी पूर्ण प्रयत्न करीन.’’
आमदार भास्कर जाधव म्हणाले, ‘‘जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज हिंदुत्वाच्या विचारांचे वारसदार आहेत. ते अध्यात्माचा वारसा जगासमोर पोचवण्याचे कार्य करत आहेत आणि पुढेही करतील. प्रभु श्रीरामचंद्र यांनी खारीचाही सत्कार केला. आजचा आमचा करण्यात आलेला सत्कारही त्याच तोलामोलाचा आहे. माझ्या प्रदीर्घ कारकीर्दीत एकही भ्रष्टाचाराचा आरोप नाही कि चारित्र्यावर शिंतोडो नाहीत. आयुष्यात पुढेही निष्कलंक रहाण्याचे बळ मिळो.’’
मंत्री योगेश कदम म्हणाले, ‘‘महाराष्ट्रासाठी कार्य करण्याची ऊर्जा येथे मिळाली. राज्य शासन तरुणांना व्यसनांपासून वाचवण्यासाठी प्रयत्न करीत आहे. सरकार आपल्या कामात अल्प पडणार नाही. माझा हिंदु धर्मात जन्म झाला, याचा मला सार्थ अभिमान आहे.’’
उद्योग मंत्री उदय सामंत म्हणाले, ‘‘प्रयागराज येथील कुंभमेळ्याच्या प्रतिसादात महाराजांचा वाटा महत्वाचा आहे. कारण त्यांनी तिथे जाऊन ‘बटेंगे तो कटेंगे’चा नारा दिला. त्याने हिंदू जागृत झाला. श्रद्धा आणि अंधश्रद्धा ही प्रत्येकाच्या मानण्यावर आहे. महाराजांनी राबविलेले उपक्रम देहदान, रुग्णवाहिका सेवा, रक्तदान महायज्ञ ही अंधश्रद्धा नाही. ती खर्या अर्थाने श्रद्धा आहे. ज्या ज्या वेळी हिंदु धर्मावर अन्याय झाला, त्या त्या वेळी त्याला वाचा फोडण्याचे काम प.पू.कानिफनाथ महाराजांनी केले आहे. शासन तुमच्या सोबत आहे.’’

मंत्री नितेश राणे म्हणाले, ‘‘ मी हिंदु आहे. माझा जन्म आणि मृत्यू दाखल्यावर हिंदूच उल्लेख राहील. महाराजांचे घरवापसीचे (धर्मांतरित हिंदूंना पुन्हा हिंदु धर्मात आणण्याचे) कार्य मोठ्या प्रमाणावर होणे आवश्यक आहे. लव्ह जिहाद रोखला पाहिजे. सरकारचे धर्मांतर विरोधी कायदा आणण्याचे प्रयत्न चालू आहेत. आपल्या भूमींचे संरक्षण करण्यासाठी ‘सनातन बोर्ड’ स्थापन करण्यासाठी जगद्गुरूंनी पुढाकार घ्यावा. सनातन बोर्डाची स्थापना करून वक्फ बोर्डाने लाटलेल्या हिंदूंच्या भूमी पुन्हा मिळवण्यासाठी प्रयत्न करू.’’