साधकाची चंचल मनःस्थिती ओळखून त्याला साधनेत साहाय्य करणारे कृपाळू परात्पर गुरु डॉ. आठवले !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘अन्य एका राज्यातील एका साधकाच्या तेथील अनेक संतांच्या ओळखी होत्या. त्याने त्यांपैकी एकेक संतांना रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट देण्याविषयी निमंत्रण दिले आणि त्याप्रमाणे त्या त्या संतांनी रामनाथी आश्रमाला भेट दिली. त्या संतांची परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी भेट व्हायची. तेव्हा सत्संगाच्या शेवटी परात्पर गुरु डॉक्टर संतांना आणणार्‍या साधकाला म्हणाले, ‘‘आजपासून हे संत तुझे गुरु आहेत. त्यांची सेवा करत जा. आता मला तुझी चिंता नाही.’’ त्यानंतर तो साधक परात्पर गुरु डॉक्टरांना म्हणाला, ‘‘त्या संतांची सेवा करायची आहे; पण माझे श्रद्धास्थान तुम्हीच आहात.’’

हा प्रसंग झाल्यानंतर ३ – ४ दिवसांनी त्या साधकाच्या ओळखीच्या अन्य संतांनी रामनाथी आश्रमाला भेट दिली. सत्संगाच्या शेवटी परात्पर गुरु डॉक्टरांनी त्या साधकाला सांगितले. ‘‘हे तुझे गुरु. त्यांनी सांगितलेले ऐकत जा. त्यातून तुझी आध्यात्मिक प्रगती होईल.’’ त्यानंतर तो साधक परात्पर गुरु डॉक्टरांना परत म्हणाला, ‘‘असे असले, तरी माझे श्रद्धास्थान तुम्हीच आहात.’’

श्री. राम होनप

वरील प्रसंगाची पुनरावृत्ती त्या साधकाच्या संदर्भात ४ – ५ निरनिराळ्या संतांच्या वेळी आणि थोड्या दिवसांच्या अंतरांमध्ये घडली. त्यानंतर माझ्या मनात पुढील विचार येऊ लागले, ‘प्रत्येक साधकाच्या आयुष्यात एकच गुरु असतात. येथे परात्पर गुरु डॉक्टर त्या साधकाला विविध संतांना उद्देशून ‘हेच तुझे गुरु’, असे सांगत आहेत. त्या साधकाचे ‘गुरु’ दर काही दिवसांनी कसे पालटत आहेत ? परात्पर गुरु डॉक्टर असे का करतात ?’ हे प्रसंग चालू असतांना ‘मला हसावे कि रडावे’, हे समजत नव्हते.

त्यानंतर काही मासांनी मला वरील प्रश्नांचे पुढील उत्तर मिळाले, ‘त्या साधकाचे मन पुष्कळ चंचल होते. त्याची एका गुरूंवर श्रद्धा नव्हती आणि साधनेचा पायाही पक्का नव्हता. अशा परिस्थितीत परात्पर गुरु डॉक्टरांनी त्या साधकाला ‘एका गुरूंवर श्रद्धा ठेव आणि साधना कर’, असे सांगितले असते, तर त्या साधकाला ते जमले नसते. त्यामुळे त्यांनी त्या साधकाची चंचल मनःस्थिती ओळखून त्याला मार्गदर्शन केले. ‘विविध संतांचा सहवास आणि त्यांची सेवा करत राहिल्याने त्या साधकाला साधनेत साहाय्य होणार आहे’, या उद्देशाने परात्पर गुरु डॉक्टर त्याला मार्गदर्शन करत होते’, असे विचार माझ्या मनात आले.’

– श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (११.७.२०२२)