विशाळगडावरील अवैध कूपनलिका बंद करा, तसेच वन विभागाच्या हद्दीतील अतिक्रमण तोडा ! – हिंदु एकता आंदोलन

निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना निवेदन देतांना ‘हिंदु एकता आंदोलना’चे पदाधिकारी, कार्यकर्ते

कोल्हापूर – विशाळगडावर अनुमती न घेता १६ कूपनलिका खोदण्यात आल्या असून गडाच्या पायथ्याशी, तसेच वन विभागाच्या जागेत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेले आहे. तरी विशाळगडावरील या अवैध कूपनलिका तात्काळ बंद कराव्यात, तसेच वन विभागाच्या हद्दीतील अतिक्रमण तोडावे, या मागणीचे निवेदन ‘हिंदु एकता आंदोलना’च्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना देण्यात आले. या प्रसंगी ‘हिंदु एकता आंदोलना’चे प्रदेशाध्यक्ष नितीन शिंदे, सांगली जिल्हाध्यक्ष संजय जाधव, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष दीपक देसाई, राजू जाधव, अनिरुद्ध कुंभार यांसह अन्य उपस्थित होते. (प्रशासन झोपा काढत होते का ? – संपादक)

कोल्हापूर जिल्हाधिकार्‍यांच्या नावे असलेल्या निवेदनात म्हटले आहे की, विशाळगडावर असलेल्या दर्गा परिसरात अद्यापही मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आहे. ते तात्काळ भुईसपाट करावे. नरवीर बाजीप्रभु देशपांडे आणि नरवीर फुलाजी प्रभु देशपांडे यांच्या समाधीकडे जाणार्‍या रस्त्यावर ३ मजली सिमेंटच्या इमारती बांधण्यात आल्या असून त्या तात्काळ भुईसपाट कराव्यात. ‘आजपर्यंत काढलेल्या सर्व अतिक्रमणांची सविस्तर लेखी माहिती दिली जाईल, तसेच संपूर्ण गड अतिक्रमणमुक्त केला जाईल’, अशी ग्वाही निवासी जिल्हाधिकारी संजय तेली यांनी शिष्टमंडळास दिली.