
सातारा, १४ फेब्रुवारी (वार्ता.) – युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज आणि सर्वच महापुरुष यांचा अवमान यांविषयी कडक कायदा संमत करण्यात यावा, तसेच युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास सरकारने प्रकाशित करावा, अशी मागणी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी निवेदनाद्वारे देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली. (अशी मागणी का करावी लागते ? प्रशासनाने स्वत:हून कृती केली पाहिजे. – संपादक)
या निवेदनामध्ये म्हटले आहे की,
१. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा कर्तृत्ववारसा अतुलनीय आहे. छत्रपती शिवराय हे संपूर्ण राष्ट्रासाठी प्रेरणास्रोत आहेत; मात्र अलीकडच्या काळात छत्रपतींच्या जीवनचरित्राविषयी अपमानास्पद टीकाटिप्पणी करून समस्त शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या जाण्याच्या घटना वाढत आहेत. छत्रपती शिवराय आणि सर्वच राष्ट्रपुरुषांविषयी जाणूनबुजून अन् खोडसाळपणे अपमानास्पद टीकाटीप्पणी करणार्यांवर पोलिसांनी स्वतःहून कडक कायदेशीर कारवाई करण्यासाठी कठोर कायदा संमत करावा.
२. छत्रपती शिवरायांचे भव्य स्मारक होणे आवश्यक आहे. हे स्मारक नवी देहली येथे झाले पाहिजे. ज्यायोगे राज्यशास्त्र, प्रशासन, व्यवस्थापन, वास्तूशास्त्र, कायदा, जलनीती, अर्थशास्त्र आदी विषयांतील अभ्यासकांसाठी हे स्मारक एक पर्वणी ठरेल. तसेच या निमित्ताने छत्रपती शिवरायांच्या इतिहासाचे जतन आणि संवर्धन अचूक होईल.
३. शिवछत्रपतींच्या जीवनावर आणि ऐतिहासिक घटनांवर असंख्य चित्रपट, मालिका, ‘वेबसिरीज’, माहितीपट निर्माण केले जातात. यांपैकी बर्याच कलाकृती विकृत आणि काल्पनिक सादर केल्या जातात. तोच इतिहास खरा मानला जातो. काही वेळा काल्पनिक आवृत्यांमुळे वादही उफाळून येतात. यामुळे समाजात जातीय तेढ निर्माण होतो. याविषयी नियमन करण्याचे उत्तरदायित्व केंद्रीय परिनिरीक्षण मंडळाकडे असले, तरी अनेक वेळा वादग्रस्त पैलूंकडे दुर्लक्ष केले जाते. यामुळे खोट्या कथेचा प्रसार होतो. यावर उपाय म्हणून इतिहासकार, संशोधक आणि तज्ञ यांचा समावेश असलेली एक विशेष समिती स्थापन करण्यात यावी.