स्वातंत्र्य चळवळ अहिंसक होती, हे दाखवण्यासाठी क्रांतीकारकांना अपकीर्त करण्यात आले ! – डॉ. शांतिश्री धुलिपुडी पंडित, कुलगुरु, जे.एन्.यू.

पुणे येथील व्याख्यान

डॉ. शांतिश्री धुलिपुडी पंडित

पुणे – डाव्यांचे कथन अतिशय भक्कम आहे. साम्यवादी लोकच क्रांतीकारी असू शकतात, असे आजवर पुढे आणण्यात आले; मात्र वासुदेव बळवंत फडकेही क्रांतीकारक होते, हे लोकांसमोर आणले पाहिजे. पुण्यासारख्या बुद्धीवंतांच्या शहरातून हे कथन चालू झाले पाहिजे. त्यासाठी लेखन करावे लागेल आणि बोलावे लागेल. स्वातंत्र्य चळवळ अहिंसक होती, हे दाखवण्यासाठी क्रांतीकारकांना अपकीर्त करण्यात आले. स्वातंत्र्यवीर सावरकर हयात असेपर्यंत त्यांना ज्या प्रकारची वागणूक देण्यात आली, तो त्यांच्यासारख्या महान व्यक्तीमत्त्वाचा अपमान होता. जवाहरलाल नेहरू विद्यापिठापेक्षा (‘जे.एन्.यू.’पेक्षा) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ साम्यवादी आहे, असे वक्तव्य जे.एन्.यू.च्या कुलगुरु डॉ. शांतिश्री धुलिपुडी पंडित यांनी केले. ‘महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी’च्या वतीने आयोजित ‘आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके स्मृती व्याख्याना’त ‘नव्या युगातील भारतीय समाज : संधी आणि आव्हाने’ या विषयावर पंडित यांनी त्यांचे विचार मांडले.

सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल (निवृत्त) भूषण गोखले, उपाध्यक्ष प्रदीप नाईक, संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब शिंदे, उपाध्यक्ष आनंदी पाटील या वेळी उपस्थित होते.

डॉ. शांतिश्री पंडित पुढे म्हणाल्या की,

१. राहुल गांधी, सोनिया गांधी यांना पोर्ट ब्लेअरला पाठवून त्या खोलीत ठेवा. कोणता काँग्रेस नेता मंडाले किंवा पोर्ट ब्लेअरला पाठवला गेला होता ? सगळ्यांना ‘व्हीआयपी ट्रीटमेंट’ (महनीय व्यक्तींसाठीची व्यवस्था) होती. तरीही आज येऊन भाषणे करतात. आपल्या क्रांतीकारकांचा आपण सन्मान राखला पाहिजे.

२. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेली राज्यघटना आज धोक्यात आहे. धार्मिक लोकसंख्या असमतोल हे तिचे कारण आहे. हिंदू बहुसंख्यांक असेपर्यंतच भारत धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही देश रहाणार आहे.

३. महाराष्ट्रात ५ टक्के मतदान वाढल्यावर काय निकाल लागला, ते पहा. ही मध्यमवर्गियांची शक्ती आहे. मध्यमवर्गियांनी त्यांचे दायित्व झटकल्यास देश विकसित होणार नाही.

४. हिंदु समाज एकत्र आला, तरच पुढे जाणे शक्य आहे, हे सावरकरांनी ‘पतित पावन संघटने’च्या माध्यमातून सांगितले होते. नुसत्या आर्थिक विकासाने काही होणार नाही.

५. साम्यवाद्यांनी खोटे बोलून इतिहासात गोंधळ घातला आहे. भारतीय संस्कृती १० सहस्र वर्षांपेक्षा जुनी आहे, हे ‘कार्बन डेटिंग’मधून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पाश्चात्त्यांनी आपल्याला सुसंस्कृत केलेले नाही, तर आपण त्यांना सुसंस्कृत केले आहे. हे आपण बोलले पाहिजे. साम्यवाद्यांना पुरातत्वशास्त्र आवडत नाही; म्हणून सध्या ‘डिग फॉर कम्युनल’ (स्वैर अनुवाद दिला आहे – साम्यवाद्यांची कबर खोदा) असा नवा नारा देण्यात येत आहे.

संपादकीय भूमिका

भारतात धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही टिकवण्यात बहुसंख्यांक हिंदूंचे योगदान आहे, हे साम्यवादी विचारसरणी असणार्‍यांनी लक्षात घ्यावे !