
प्रयागराज, १४ फेब्रुवारी (वार्ता.) – श्रीकृष्णभक्तीचा प्रसार संपूर्ण विश्वात करणारे ‘इस्कॉन’चे संस्थापक ‘ए.सी. भक्तीवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद’ यांचा तीर्थक्षेत्री प्रयाग येथे अखिल भारतीय आखाडा परिषदेने ‘विश्वगुरु’ उपाधी देऊन गौरव केला. महाकुंभमेळ्यामध्ये सेक्टर ९ मधील निरंजनी आखाड्याच्या शिबिरामध्ये झालेला हा कार्यक्रम अत्यंत हृदयस्पर्शी ठरला. श्रील प्रभुपाद यांची मूर्ती व्यासपिठावर स्थानापन्न करून अनेक संत आणि इस्कॉनचे साधक यांच्या उपस्थितीत मंगलमय वातावरणामध्ये हा कार्यक्रम पार पडला. ‘विश्वगुरु’पद प्रदान केल्यावर सभागृहात ‘श्रील प्रभुपाद’ यांचा जयजयकार करून सर्व भाविकांनी आनंद व्यक्त केला.
कार्यक्रमामध्ये व्यासपिठावर सर्व संतगणांच्या मध्यमागी आसनावर ‘श्रील प्रभुपाद’ यांची आसनस्थ मूर्ती ठेवण्यात आली होती. वेदमंत्रपठणाद्वारे या वेळी ‘श्रील प्रभुपाद’ यांच्या मूर्तीला जलाभिषेक घालण्यात आला. त्यानंतर वेदमंत्रपठणासह सर्व संतगणांनी ‘श्रील प्रभुपाद’ यांच्या मूर्तीवर पुष्पवर्षावर केला. इस्कॉनच्या ‘हरे कृष्ण’ चळवळीचे अध्यक्ष श्री. मधु पंडितजी दास, उपाध्यक्ष श्री. चंचलपती दास यांनी सर्व संतगणांचा पुष्पहार घालून सन्मान केला. या वेळी व्यासपिठावर उपस्थित सर्व संतांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
विश्वातील सर्व सनातनप्रेमींसाठी आनंदाचा क्षण ! – स्वामी कैलासानंद गिरि महाराज, पीठाधीश्वर, निरंजन आखाडा
भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेमध्ये सांगितले आहे की, जो मला भजतो, त्याला मी भजतो. ‘श्रील प्रभुपाद’ यांचा ‘विश्वगुरु’ उपाधीने सन्मान आणि त्यांचा जयजयकार हा त्याचा प्रत्यय आहे. श्रीकृष्णाचे नाव घराघरांत पोचवणे त्यालाच शक्य आहे, ज्याला श्रीकृष्णाने पाठवले आहे. ‘श्रील प्रभुपाद’ यांना ‘विश्वगुरु’ ही उपाधी दिल्याने जगातील सर्व सनातनप्रेमींना आनंद झाला आहे.
‘श्रील प्रभुपाद’ यांना ‘विश्वगुरु उपाधी म्हणजे सूर्याला दीप दाखवण्यासारखे ! – महंत स्वामी रवींद्र पुरी महाराज, राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भारतीय आखाडा परिषद
ज्या वेळी भारतात गरिबी होती, त्या वेळी इंग्रजांच्या देशात जाऊन सनातन संस्कृतीचा प्रचार करणे, ही मोठी गोष्ट आहे. श्रील प्रभुपाद यांनी अमेरिकेत कृष्णभक्तीचा प्रसार करून तेथे वृंदावन वसवले. श्रील प्रभुपाद यांनी समर्पित भावाने भगद्तगीतेचा प्रसार केला. श्रील प्रभुपाद यांचे कार्य इतके तेजस्वी आहे की, त्यांना देण्यात आलेली ‘विश्वगुरु’ ही उपाधी म्हणजे सूर्याला दीप दाखवण्यासारखे आहे.
‘श्रील प्रभुपाद’ यांच्यामुळे पाश्चिमात्यांनी केला सनातन संस्कृतीचा अंगीकार ! – मधु पंडितजी दास, अध्यक्ष, ‘हरे कृष्ण’ आंदोलन
इंग्रजांनी भारताला लुटले; मात्र भारताचे आध्यात्मिक धन ते लुटू शकले नाहीत. विश्वकल्याणासाठी या आध्यात्मिक संस्कृतीचा प्रसार ‘श्रील प्रभुपाद’ यांनी पाश्चात्त्य देशांमध्ये केला. श्रील प्रभुपाद यांनी ७० व्या वर्षी अमेरिकेला जाऊन सनातन धर्माचा प्रसार केला. त्यांनी विश्वामध्ये सनातन धर्माचे अनुयायी निर्माण केले. त्यांनी केलेल्या श्रीकृष्णभक्तीच्या प्रचारामुळे विश्वातील विविध देशातील युवकांनी सनातन संस्कृतीचा अंगीकार केला.
कार्यक्रमाला उपस्थित संतगण
निरंजनी आवाहन आखाड्याचे पीठाधीश्वर स्वामी कैलासानंद गिरि महाराज, अखिल भारतीय आखाडा परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष महंत स्वामी रवींद्र पुरी महाराज, आवाहन पीठाचे पीठाधीश्वर स्वामी अरुण गिरि महाराज, वरिष्ठ महामंडलेश्वर तेजस्वानंद गिरि महाराज, महामंडलेश्वर नारायण गिरि महाराज, महामंडलेश्वर स्वामी प्रकाशानंद गिरि महाराज, महामंडलेश्वर स्वामी देवानंद गिरि महाराज, साध्वी आत्मचेतना गिरि, दिव्यचेतना गिरि, निरंजन आखाड्याचे दिनेश गिरि महाराज, स्वामी प्रकाशानंद महाराज, महामंडलेश्वर स्वामी वेदानंद महाराज, महामंडलेश्वर साध्वी आत्मचेतना गिरि, महामंडलेश्वर साध्वी दिव्यचेतना गिरि, युवा संत सचिव दिनेश गिरि महाराज, महामंडलेश्वर स्वामी अनंतानंद गिरि आदी संतगण उपस्थित होते.