Mahakumbh 2025 : महाकुंभक्षेत्रातून बाहेर पडणार्‍या कल्पवासियांची अडवणूक न करण्याचा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा आदेश !

(कुंभमेळ्यात जे गंगानदीच्या किनार्‍यावर व्रत करतात, त्यांना ‘कल्पवासी’ म्हटले जाते.)

उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

प्रयागराज, १४ फेब्रुवारी (वार्ता.) – महाकुंभक्षेत्रातून बाहेर पडणार्‍या कल्पवासियांची कोणत्याही प्रकारे अडवणूक करू नये. कुंभक्षेत्रातून बाहेर पडणार्‍या कल्पवासियांच्या गाड्यांना विना अडथळा महाकुंभक्षेत्राच्या बाहेर जाऊ द्यावे, अशी स्पष्ट सूचना उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पोलीस आणि प्रशासन यांना दिली आहे. त्यामुळे १३ फेब्रुवारीपासून पोलिसांनी वाहने अडवण्याचा प्रकार थांबवला आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आदेशानंतर प्रयागराज मेळा प्राधिकरण कार्यालयाद्वारे महाकुंभक्षेत्रात लावण्यात आलेल्या डिजीटल फलकांवर कल्पवासी आणि आखाड्यांतील साधू यांना बाहेर जाण्यासाठी सहकार्य करण्याची सूचना देण्यात आली आहे. महाकुंभपर्वामध्ये १० लाखांहून अधिक कल्पवासी आले होते. १२ फेब्रुवारी या दिवशी कल्पवास संपला आहे. त्यामुळे १३ फेब्रुवारीपासून सर्व कल्पवासी त्यांच्या गावी निघाले आहेत. विविध राज्यांतून समूहाने आलेले कल्पवासी ट्रक, टॅम्पो आदी मोठ्या गाड्यांतून निघत आहेत. भाविकांच्या गर्दीमुळे चौकाचौकात लावलेले ‘बॅरिगेट्स’ (अडथळे) आणि पोलिसांची सुरक्षाव्यवस्था यांमुळे महाकुंभक्षेत्रातून बाहेर पडण्यास कल्पवासियांना अडचण येऊ नये, यासाठी मुख्यमंत्र्यांनी पोलीस आणि प्रशासन यांना कल्पवासियांना सहकार्य करण्याचा आदेश दिला आहे.