
बदलापूर – येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा बसवण्यात आला आहे. येत्या १८ फेब्रुवारी या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण केले जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर या पुतळ्याची मिरवणूक काढण्यात आली. बदलापूरकरांनी जल्लोषात शिवशिल्पाचे स्वागत केले. बदलापूरच्या उल्हासनदी किनारी शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर १८ फेब्रुवारीला पुतळ्याचे अनावरण होईल.
बदलापूर शहराला छत्रपती शिवाजी महाराज यांनी भेट दिल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. स्वातंत्र्यपूर्वकाळात लोकमान्य टिळकांनी जातीय सलोख्यासाठी चालू केलेली शिवजयंती आणि गणेशोत्सव या उत्सवांना बदलापूर येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिरही बदलापूर गावात आहे. बदलापूर गावाच्या प्रवेशद्वारावर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्यासाठी स्थानिक आमदार किसन कथोरे आग्रही होते. विधानसभा निवडणुकीपूर्वी या पुतळ्यासाठी निधी संमत झाला होता.