मणीपूरमधील शौर्य आणि पराक्रम यांसाठी पुरस्कार प्रदान !

रांची – मणीपूर येथील अत्यंत धोकादायक परिस्थितीत अपवादात्मक शौर्य आणि धैर्य प्रदर्शित करणारे मेजर शांतनू घाटपांडे यांना ‘सेना मेडल (पराक्रम)’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. असाधारण धैर्य, नेतृत्वगुण आणि धडाडीच्या कामगिरीसाठी त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला. रांची येथे झालेल्या ‘सैन्य सन्मान समारंभा’त त्यांना हा प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान करण्यात आला.
मणीपूरमधील धाडसी नेतृत्व !
मेजर शांतनू घाटपांडे हे मणीपूरमधील संवेदनशील भागात ‘कॉलम कमांडर’ म्हणून तैनात होते. ४ ऑक्टोबर २०२३ या दिवशी सशस्त्र दंगलखोरांनी एका गावावर अंदाधुंद गोळीबार करत आक्रमण केले. स्वतःच्या सुरक्षिततेचा विचार न करता मेजर घाटपांडे यांनी धैर्याने दंगलखोरांवर प्रत्युत्तरात्मक आक्रमण केले आणि त्यांना पळवून लावले. त्यांच्या धडाडीमुळे निष्पाप गावकर्यांना जवळच्या शाळेत सुरक्षित हालवता आले. ७ ऑक्टोबर या दिवशी सशस्त्र दंगलखोरांनी गाव पेटवण्याच्या उद्देशाने पुन्हा आक्रमण केले; मात्र मेजर घाटपांडे यांनी स्वत:च्या तुकडीचे धैर्याने नेतृत्व करत दंगलखोरांचा प्रतिकार करून त्यांना पळवून लावले.
गुप्तचर यंत्रणा आणि युद्धसामग्री जप्त !
मेजर शांतनू यांनी प्रभावी आणि विश्वासार्ह गुप्तचर यंत्रणा विकसित केली. त्यामुळे दडवलेली युद्धसामग्री शोधता आली. १६ नोव्हेंबर आणि ९ डिसेंबर २०२३ या दिवशी त्यांनी २ मोठ्या मोहिमा यशस्वीपणे पार पाडून दंगेखोरांकडून शस्त्रसाठा हस्तगत केला.
संपादकीय भूमिकापाश्चात्त्य विकृतीच्या अंधानुकरणामुळे दिशाहीन झालेल्या तरुणांनी मेजर शांतनू घाटपांडे यांच्यासारख्या पराक्रमीविरांचा आदर्श घ्यावा ! |