ठाणे येथे कोट्यवधींचा ‘जी.एस्.टी.’ घोटाळा करणार्‍या धर्मांधाला अटक

आरोपीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

ठाणे – येथे कोट्यवधी रुपयांचा जी.एस्.टी. (वस्तू आणि सेवा कर) घोटाळा उघडकीस आला आहे. या प्रकरणात अधिकार्‍यांनी २६.९२ कोटी रुपयांच्या बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट घोटाळ्याशी संबंधित जी.एस्.टी. चोरीची यंत्रणा उघड केली. या टोळीच्या प्रमुखाला मीरा रोड येथून अटक करण्यात आली आहे. कपाडिया महंमद सुल्तान असे त्याचे नाव आहे. त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या वेळी १४० कोटी रुपयांची करचोरी केल्याचे समोर आले.

सुल्तान याने १८ बनावट आस्थापनांच्या नावाने देयके ‘इनव्हॉइस’ करून ‘जी.एस्.टी.’चा परतावा घेतला. या बनावट परताव्यांमधून त्याने १४० कोटी रुपयांचा घोटाळा केला. त्याने ‘रॉयल एंटरप्राइज्’, ‘सरस्वती एंटरप्राइजेस’, ‘लुकास इन्फ्राट्रेड एल्.एल्.पी.’ आणि ‘मारुती ट्रेडिंग’ यांसारखी आस्थापने सरकारची फसवणूक करण्यासाठी स्थापन केली होती. यासाठी त्याने विविध लोकांची आधारकार्ड, पॅनकार्ड आणि इतर कागदपत्रे वापरली होती. त्याने या लोकांना पैसेही दिले होते. या ओळखपत्रांचा गैरवापर करून खोटी बँक खाती उघडली आणि त्यामध्ये जी.एस्.टी. परतावा घेतला.

संपादकीय भूमिका :

  • सरकारची फसवणूक करणार्‍या धर्मांधांकडून घोटाळ्याची रक्कम सव्याज वसूल करायला हवी !
  • आस्थापने फसवणूक करत असल्याचे सरकारी यंत्रणांच्या लक्षात कसे आले नाही ? कोट्यवधींचा घोटाळा होईपर्यंत या यंत्रणा काय करत होत्या ?