ज्येष्ठ शास्त्रीय गायक पंडित प्रभाकर कारेकर यांचे निधन !

पंडित प्रभाकर कारेकर

मुंबई – प्रसिद्ध हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत गायक पंडित प्रभाकर जनार्दन कारेकर (वय ८० वर्षे) यांचे यांचे १२ फेब्रुवारीच्या रात्री त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. दादर येथील शिवाजी पार्क स्मशानभूमीत सायंकाळी ५ वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात तीन मुले आणि सुना-नातवंडे असा परिवार आहे.

पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्याकडे ९ वर्षे आणि पुढे पंडित सी.आर्. व्यास यांच्याकडूनही त्यांनी शास्त्रीय गायनाचे धडे घेतले. तीन वेगवेगळ्या शैलीत गाणार्‍या गुरूंकडून संगीताचे शिक्षण घेत, त्याला स्वत:चा संगीत अभ्यास आणि सराव यांची जोड देत गायक म्हणून स्वत:ची वेगळी शैली विकसित केली.

त्यांची ‘बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल’, ‘करिता विचार सापडले वर्म’, ‘वक्रतुंड महाकाय…’, ‘हा नाद सोड’, ‘नभ मेघांनी आक्रमिले’ यांसारखी अनेक गाणी लोकप्रिय आहेत. तानसेन सन्मान (२०१४), संगीत नाटक अकादमी (२०१६), लता मंगेशकर पुरस्कार, गोमांत विभूषण पुरस्कार (२०२१) आदी प्रतिष्ठित पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले होते.

हिंदुस्थानी संगीताचा ‘स्वर प्रभाकर’ दिगंतात विसावला ! – मुख्यमंत्री

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई – हिंदुस्थानी संगीतातील ‘स्वर प्रभाकर’ दिगंतात विसावला आहे, अशी शोकभावना व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ शास्त्रीय गायक पंडित प्रभाकर कारेकर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. ‘धारदार, पल्लेदार स्वरांनी भारतीय संगीत क्षेत्राचे स्वर नभांगण उजळून टाकणारा किमयागार म्हणून ज्येष्ठ शास्त्रीय गायक पंडित प्रभाकर कारेकर अजरामर रहातील’, असेही मुख्यमंत्र्यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.

ते म्हणाले, ‘‘पंडित कारेकर यांचा स्वर म्हणजे हिंदुस्थानी संगीतातील अपूर्व ठेवा आहे. पंडितजींच्या निधनाने संगीत क्षेत्रातील तीन पिढ्यांना जोडणारा मार्गदर्शक दिगंतात विसावला. ते स्वरांनी अनंतकाळ आपल्या सोबतच रहातीलच; पण त्यांचे निधन ही भारतीय संगीत क्षेत्राची भरून निघणार नाही अशी हानी आहे. पंडितजींच्या आत्म्यास शांती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना !’’