धर्मामध्ये दक्षता वा सावधपणा महत्त्वाचा !

प.पू. स्वामी वरदानंद भारती यांचे धर्माविषयी अमूल्य मार्गदर्शन असणारी लेखमाला !

प.पू. स्वामी वरदानंद भारती

प्रश्न : किं स्वित् एकपदं धर्मयम् ? धन्यानां उत्तमं किं स्वित् ?

अर्थ : धर्माचा मुख्य आधार कोणता ? धन्यवाद देण्यास पुरुषाचा योग्य गुण कोणता ?

उत्तर : दाक्ष्यम् ।

अर्थ : दक्षता, सावधपणा.

दक्षता नसेल, तर धार्मिक कृत्ये नीटपणे पार पडणार नाहीत; पण याची जाणीव ठेवणारे लोक विरळच असतात. धार्मिक कृत्ये भागवाभागवी करत घाईने कशीतरी उरकली जातात. ‘धर्मकृत्य शास्त्रशुद्ध आणि यथासांग व्हावे’, अशी दक्षता कुणी घेत नाही. समर्थ म्हणतात,

यथासांग ते कर्म तेही घडेना ।

घडे कर्म ते पुण्यगाठी पडेना ।।

–  मनाचे श्लोक, श्लोक १००

अर्थ : आपल्याकडून कर्म यथासांग घडत नाही. त्यामुळे त्याचे पुण्यही आपल्या पदरी मिळत नाही.

‘विवाहासमयीचे धार्मिक विधी, आहे त्या साहित्यावर घाईने उरका’, असे पुरोहितास सांगितले जाते; पण स्वागत समारंभासारखा कार्यक्रम ३ ते ४ घंटे चालतो. आलेल्या लोकांचे आतिथ्य यथासांग होते आहे कि नाही, ते नीट पाहिले जाते. तेव्हा ज्यांची वृत्ती खरोखरीच धार्मिक आहे, त्यांनी तरी करायची धार्मिक कृत्ये विधीपूर्वक होतील’, असे कटाक्षाने पाहिले पाहिजे.

– प.पू. स्वामी वरदानंद भारती (पूर्वाश्रमीचे अनंतराव आठवले)

(साभार : ग्रंथ ‘यक्षप्रश्न’)