
देहली – अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त येथील महाराष्ट्र सदनात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘महादजी शिंदे राष्ट्रीय गौरव’ पुरस्कार ११ फेब्रुवारी या दिवशी प्रदान करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. ‘सरहद’ संस्थेकडून दिल्या जाणार्या या पुरस्कारानिमित्त संस्थेला पुरस्काराची ५ लाख रुपये रक्कम आणि अधिकचे ५ लाख रुपये असे त्यांनी दिले. महादजी शिंदे यांचे वंशज केंद्रीय राज्यमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी महादजी शिंदे यांच्या इतिहासातील नोंदी उलगडल्या.
अभ्यासक्रमात महादजी शिंदे यांचा इतिहास देण्याचा प्रयत्न करू ! – एकनाथ शिंदे
‘महादजी शिंदे राष्ट्रीय गौरव’ पुरस्कार प्राप्त होणे हे माझे सौभाग्य आहे. यामुळे माझे दायित्व वाढले आहे. कवी, अभंगकार म्हणूनही ते सुप्रसिद्ध होते. ग्वाल्हेर येथील धृपद घराणे आणि खयाल गायकी घराण्याची कितीतरी गीते त्यांनी लिहिलेली आहेत. महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण अभ्यासक्रमात पराक्रमी महादजी शिंदे यांचा इतिहास असावा यासाठी प्रयत्न करू’, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या वेळी केले.