ठाणे लोकसभेचे शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांची संसदेत मागणी !

ठाणे – सामाजिक माध्यमे, डिजिटल मिडिया आणि ‘ओटीटी’ (ओव्हर द टॉप) प्लॅटफॉर्मवर सध्या अश्लीलतेचा कहर चालू आहे. अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली प्रतिदिन बेताल वक्तव्ये केली जात आहेत. अशा घटनांमुळे भारतीय संस्कृती अपकीर्त होत आहे. सामाजिक माध्यमे, डिजीटल मीडिया आणि ओटीटी यांच्यासाठी माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडून मार्गदर्शक तत्त्वे जारी केलेली आहेत; पण त्यांना लगाम लावण्यासाठी कठोर कायदा करावा, अशी मागणी ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेत शून्य प्रहराच्या वेळेत केली. त्यांच्या या मागणीला सर्वपक्षीय खासदारांनी पाठिंबा दर्शवला.
यू ट्यूबर रणवीर अलाहाबादिया याने आई-वडिलांसंदर्भात आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी खा. म्हस्के यांनी संसदेत संताप व्यक्त केला होता. त्याच्यावर तात्काळ गुन्हा नोंदवण्याची मागणी, तसेच त्याच्यावर बंदी आणण्याची सूचना केली. ‘भारतियांनीही अलाहाबादिया याला ‘अनफॉलो’ (सूचीतून काढणे) करावे’, असे आवाहन म्हस्के यांनी केले.
सामाजिक माध्यमांचा वापर करणार्यांनी मर्यादांचे उल्लंघन केल्यास ‘रण’ माजू शकते !
सामाजिक माध्यमांमध्ये व्यक्त होतांना भारताची संस्कृती, इतिहास, परंपरा आणि जीवनपद्धत विसरून चालणार नाही. कोणत्याही ‘पॉडकास्टर’ला त्याचे विचार व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य असले, तरीही स्वत:ला मर्यादा घालून घ्याव्यात, अन्यथा लोकांच्या मोठ्या रोषाला सामोरे जावे लागू शकते. आता सामाजिक माध्यमांचा वापर करणार्या प्रत्येक ‘वीरा’ने लक्षात घेतले पाहिजे, अन्यथा ‘रण’ माजू शकते’, अशीही चेतावणी म्हस्के यांनी दिली.